अंजनगाव सुर्जी,
vegetable-farmers-in-crisis : बाजारात टमाटर, वांगी याची आवक वाढल्याने त्याची दहा रुपये किलोने विक्री होत असल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकर्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
बाजारामध्ये टोमॅटो, वांगी याची आवक वाढल्याने आणि उठाव कमी असल्याने बाजारात त्याची विक्री दहा रुपये किलोने होत असून शेतकर्यांचा माल व्यापार्यांकडे कवडीमोल भावात जात आहे. टोमॅटोला एकरी खर्च एक ते दीड लाख रुपये येत असून सहा महिन्याचे ते पीक आहे. लागवडीपासून ६५ दिवसानंतर उत्पन्न सुरू होते. टोमॅटो व्यापार्याला तीन ते चार रुपये किलो प्रमाणे माल विकल्या जात असल्याने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. एकरी खर्चही निघणे कठीण झाले आहे. जो टोमॅटो दिवाळीनंतर चाळीस रुपये किलोने शेतकर्यांनी व्यापार्यांना विकला होता आता मात्र चार रुपये किलोने विकण्याची पाळी आली आहे. जास्त आवक आणि मागणी कमी यामुळे भाव कोसळले आहे.
तसेच वांगी शेतातून चार ते पाच रुपये किलो दराने सध्या व्यापारी नेत असल्याचे शेतकरी सांगत आहे. वांगी उत्पादन करणार्या शेतकर्याला एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. वांगी तोडीला वीस रुपये कॅरेट प्रमाणे खर्च येतो, बाजारात अडतमध्ये माल पोचविणे, दलाली कमिशन पावती, हमाली खर्च जर लक्षात घेतला तर शेतकर्याच्या हातात अत्यल्प पैसे सध्या येत असल्याने शेतकर्याचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
//आवक वाढल्याने भाव पडले
सध्या बाजारात अडतमध्ये टोमॅटो, वांगी, मेथी याची आवक वाढली असल्याने भाव कमी झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. आवकच्या मानाने उठाव कमी झाला आहे. चार ते सात रुपये किलोच्या दरात टोमॅटो, वांगी याला भाव मिळत आहे. हा सर्व बाजारात आवक वाढल्याचा परिणाम आहे.
-निलेश बोबडे
अडत व्यापारी, अंजनगाव
//भाजीपाला उत्पादकांना मदत द्यावी
शेतात दिवसभर घाम गाळून आम्ही उत्पादन काढतो. परंतु, सध्या टमाटर व वांगी याला पाहिजे तो भाव मिळत नसल्याने आमचा एकरी खर्च सुद्धा निघत नाही. आम्ही शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आलो आहे. कवडीमोल भावाने आमचा माल आम्हाला बाजारात विकावा लागत आहे. जिल्ह्यात टोमॅटोपासून ज्यूस, सॉस तयार करणारी फॅ क्टरी जर असती तर आज शेतकर्यांच्या मालाला भाव मिळाला असता. शासनाने याकडे लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना आर्थिक मदत करावी.
-सुदर्शन सावरकर
भाजीपाला उत्पादक शेतकरी रा. काकडा