अबब... कल्याण-डोंबिवली महापालिकेतील 'फाईल गायब'

25 Feb 2026 12:39:20
कल्याण,
Kalyan West Yusuf Heights कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर परिसरात मौलवी कम्पाउंडजवळ उभारलेली १० मजली बेकायदा इमारत ‘युसूफ हाइट्स’ संदर्भातील महत्त्वाची फाईल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अभिलेख विभागातून गायब झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे महापालिका प्रशासन आणि पोलिसांतून तातडीच्या कारवाईची मागणी होत आहे.
 


Yusuf Heights illegal building, Kalyan West Yusuf Heights 
महापालिकेच्या नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर अडके यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी मिळालेल्या तक्रारीच्या आधारे फाईल गायब होण्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. फाईल गायब झाल्याचा शोध महापालिकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागणी झाल्यानंतर उघडकीस आला. महापालिकेनेही तक्रारीद्वारे शक्यता व्यक्त केली आहे की, फाईल महाराष्ट्राबाहेर नेली गेली असावी किंवा नष्ट केली गेली असावी.प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की, मौलवी कम्पाउंडजवळ बेघरांसाठी ३७६ चौरस मीटर आणि खेळाच्या मैदानासाठी ११५ चौरस मीटर भूखंड आरक्षित होता. मात्र, या आरक्षित भूखंडांवरच युसूफ हाइट्स इमारत उभी केली गेली आहे. २०१२ ते २०१४ या कालावधीत जमीनमालक असमत मौलवी आणि कुलमुखत्यारधारक सलमान डोलारे यांनी मिळून इमारत विकसित केली. बिल्डर आणि त्याच्या साथीदारांनी बनावट कागदपत्रे तयार केली आणि महापालिकेला बनावट आराखडा सादर करून ओसीसुद्धा मिळविल्या असल्याचा आरोप आहे.
युसूफ हाइट्स Kalyan West Yusuf Heights इमारतीत १० गुंतवणूकदारांनी १ कोटी ८२ लाख रुपये गुंतवले होते, परंतु त्यांची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी दोन वर्षांपूर्वी बाजारपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. बिल्डर सलमान डोलारे फरार आहे आणि आता गायब झालेली फाईल त्याला वाचविण्याचा प्रयत्न म्हणून गायब झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांवर दबाव वाढला असून, युसूफ हाइट्स प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. या प्रकरणाचा निष्कर्ष काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0