मुंबई,
57% of cancers due to polluted मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे फक्त श्वसनाचे त्रासच नाही, तर प्राणघातक कर्करोगही होत असल्याचे महाराष्ट्र सरकारने विधानसभेत मान्य केले आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले की, मुंबईतील वायू प्रदूषण आणि फुफ्फुसांच्या कर्करोगामध्ये थेट संबंध आहे. आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या कर्करोग तपासणी मोहिमेत राज्यात एकूण १,६७७ रुग्ण आढळले. या तपासणीत फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रकरणे एकूण कर्करोगाच्या ५७% आहेत, तर तोंड, गर्भाशय आणि स्तन यांसारख्या इतर कर्करोगाचीही नोंद झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटना आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था आयएआरसीने बाह्य वायू प्रदूषणाला गट १ कार्सिनोजेन म्हणून घोषित केले आहे, म्हणजेच हे प्रदूषण कर्करोगासाठी मुख्य कारण ठरते. वैद्यकीय जर्नल लॅन्सेटच्या अहवालानुसार, PM 2.5 चे सूक्ष्म कण फुफ्फुसांच्या पेशींमध्ये खोलवर जात पेशींच्या डीएनएला हानी पोहचवतात, ज्यामुळे ट्यूमर होण्याचा धोका वाढतो. शोधात असेही आढळले आहे की जे लोक कधीही धूम्रपान करत नाहीत, त्यांच्यामध्येही प्रदूषित हवेतील सूक्ष्म विषारी कणांमुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहे. मुंबईमध्ये गेल्या दहा वर्षांपासून PM 2.5 आणि PM 10 चे स्तर राष्ट्रीय मानकांपेक्षा सातत्याने जास्त आहेत, तसेच पीएम 2.5 चे स्तर डब्लूब्ल्यूएचओने मानकांपेक्षा सातपट अधिक असल्याचे दिसून आले आहे.
दिल्लीतील राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमानुसार, २०२३ ते २०२५ दरम्यान महिलांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग १३.६% वाढणार आहे, तर पुरुषांमध्ये ८.८% वाढ होण्याचा अंदाज आहे. दिल्लीतील पीएम 2.5 चे प्रमाण WHO मानकांपेक्षा २० पट अधिक असल्यामुळे श्वसन, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढतो, असेही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.