मुंबई,
Big relief for state employees मुंबईत राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य शासनाने महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे हा भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अधिकृत निवेदन सादर करून याची माहिती दिली. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे पाच लाख सोळा हजार शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच जवळपास आठ लाख बहात्तर हजार निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे. ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली असून त्यामुळे मागील कालावधीतील थकबाकीही देण्यात येणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरणार असल्याचे मानले जात आहे. वाढीव महागाई भत्त्याची रक्कम फेब्रुवारी २०२६ पासूनच्या पगारात प्रत्यक्ष जमा होण्यास सुरुवात होईल.
जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या चार महिन्यांची थकबाकी मार्च २०२६ मध्ये अदा केली जाणार आहे. नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांच्या फरकाबाबत स्वतंत्र आदेश लवकरच काढले जातील, अशी माहिती देण्यात आली आहे. या निर्णयामळे शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार येणार असला तरी संबंधित विभागांच्या मंजूर तरतुदीतूनच हा खर्च भागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर थकबाकीची रक्कम मिळणार असल्याने राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.