माजी अभिनेत्री रान्या रावसह तिघांवर कारवाई

26 Feb 2026 11:39:59
बेंगळुरू
Ranya Rao सुमारे १०२.५५ कोटी रुपयांच्या सुवर्णतस्करी आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी अभिनेत्री आणि मॉडेल हर्षवर्दिनी रान्या उर्फ रान्या राव हिच्यासह अन्य दोन जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. बेंगळुरू येथील विशेष पीएमएलए न्यायालयात धनशोधन प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत हे आरोपपत्र सादर करण्यात आले असून, त्यामध्ये तरुण कोंडुरू आणि साहिल सकारिया जैन यांनाही आरोपी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. हे तिघेही सुवर्णतस्करी आणि अवैध आर्थिक व्यवहारांच्या मोठ्या रॅकेटशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
 

Enforcement Directorate, ED chargesheet, Harshavardini Ranya Rao 
ईडीने ही कारवाई Central Bureau of Investigation (सीबीआय), एसी-II, नवी दिल्ली यांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे सुरू केली. हा गुन्हा Directorate of Revenue Intelligence (डीआरआय) यांच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार दाखल करण्यात आला होता. पीएमएलएच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत धनशोधनाच्या गुन्ह्यांबाबत ही अभियोग तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
 
प्रकरणाची सुरुवात ३ मार्च २०२५ रोजी झाली. त्या दिवशी Kempegowda International Airport येथे रान्या राव हिच्याकडून १४.२१३ किलोग्रॅम परदेशी बनावटीचे सोने जप्त करण्यात आले होते. या सोन्याची अंदाजे किंमत १२.५६ कोटी रुपये होती. त्यानंतरच्या झडतीदरम्यान २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची भारतीय चलनरक्कम जप्त करण्यात आली. डीआरआयने सीमाशुल्क कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत स्वतंत्र आरोपपत्रही दाखल केले होते.
ईडीच्या तपासात मार्च २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत सुमारे १२७.२८७ किलोग्रॅम सोने, ज्याची किंमत १०२.५५ कोटी रुपये आहे, भारतात तस्करीद्वारे आणल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हे सोने तस्कर आणि ज्वेलर्सच्या जाळ्यातून देशांतर्गत बाजारात विकण्यात आले. या विक्रीतून मिळालेली रक्कम प्रामुख्याने रोख स्वरूपात स्वीकारण्यात आली आणि त्यानंतर भारतात तसेच विदेशात हवाला मार्गे तिची विल्हेवाट लावण्यात आली, असा आरोप आहे. पुढे ही रक्कम विविध बँक खाती आणि संस्थांमार्फत अशा पद्धतीने फिरवण्यात आली की ती वैध व्यावसायिक व्यवहार असल्याचा आभास निर्माण होईल.दरम्यान, २१ आणि २२ मे २०२५ रोजी कर्नाटकमधील १६ ठिकाणी पीएमएलएच्या कलम १७ अंतर्गत छापे टाकण्यात आले. या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, डिजिटल उपकरणे तसेच भारतीय आणि विदेशी चलन जप्त करण्यात आले. कलम ५० अंतर्गत अनेक व्यक्तींची जबाब नोंदवण्यात आली. तपासादरम्यान, ईडीने पीएमएलएच्या कलम ५(१) अन्वये रान्या राव हिच्या नावावर असलेल्या सुमारे ३४.१२ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर तात्पुरती जप्ती घातली आहे.
ईडीच्या मते, विदेशातून Ranya Rao  सोने खरेदी करणे, ते बेकायदेशीररित्या भारतात आणणे, रोख रकमेने विक्री करणे आणि त्यानंतर हवाला तसेच बँकिंग माध्यमांतून निधीची फेरफार करणे, अशी एक सुनियोजित यंत्रणा या तपासातून उघडकीस आली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी लवकरच विशेष न्यायालयात होणार असून, या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0