fake documents case शहर आणि जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचे मोठे प्रकरण उघडकीस आले असून, याप्रकरणी तब्बल १ हजार १६ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीतून हा प्रकार समोर आला, यामध्ये अनेक बांगलादेशी आणि अपात्र व्यक्तींचा समावेश असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
अमरावती नायब तहसीलदार (महसूल) कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, सन २०२५ आणि २०२६ या वर्षात विलंबित जन्म नोंदणी संदर्भात तहसीलदारांनी (कार्यकारी दंडाधिकारी) सुमारे २ हजार ८९६ आदेश दिले होते. या आदेशांच्या आधारे संबंधित व्यक्तींना जन्म प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महसूल विभाग, पोलिस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त चौकशी सुरू केली.
एकूण लाभार्थ्यांपैकी १ हजार १६ अर्जदारांनी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीतून दिसून आले. यामध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार करणे, खोटे पुरावे सादर करणे आणि प्रशासनाची दिशाभूल करणे यासारखे गंभीर प्रकार घडले आहेत. या सर्व १ हजार १६ जणांवर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांचे जन्म दाखले रद्द करण्याची प्रक्रियाही प्रशासनाने सुरू केली आहे.
fake documents case एवढ्या मोठ्या प्रमाणात अपात्र व्यक्तींना जन्म दाखले मिळणे, हे केवळ अर्जदारांचे कृत्य आहे की यामध्ये महसूल विभागातील काही कर्मचार्यांचे साटेलोटे आहे, याबाबत आता चर्चा रंगली आहे. डॉ. किरीट सोमय्या यांनी या संदर्भात समाज माध्यमांवर पोस्ट करत माहिती दिली आहे.