माजी आ. चरण वाघमारे यांची पत्रकार परिषदेत मागणी
भंडारा : Illegal sand permit: "Super entry" जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले असतानाही "सुपर एन्ट्री" च्या नावाखाली रेतीची अवैध चोरी सुरू असल्याचा आरोप माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही केली आहे.
माजी आमदार चरण वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या अपघाता संदर्भात तक्रार दाखल करून घेण्यावरून वाद सुरू आहेत. आ. रोहित पवार हे पवारांना न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करीत असताना पोलीस प्रशासन त्यांना सहकार्य करीत नाही. मात्र त्यांच्या या प्रयत्नांना आमचा पाठिंबा असून गरज पडल्यास भंडारा जिल्ह्यातही आंदोलन उभारू, असे चरण वाघमारे यांनी सांगितले. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन बोलताना अनेक शेतकरी आज धान विक्री पासून वंचित आहेत. हा तिढा सोडवावा आणि धनाला बोनस देण्याच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.
Illegal sand permit: "Super entry" जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीच्या संदर्भात बोलताना चरण वाघमारे यांनी सुपर एन्ट्री नावाचा प्रकार जिल्ह्यात सुरू असल्याचे सांगितले. रेती घाटांचा लिलाव झाला असताना, उत्खननावर बंदी असतानाही काही ठिकाणाहून सुपर एंट्री नावाची विशेष परवानगी देऊन रेतीची अवैध वाहतूक करण्यास मुभा दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांच्याकडे कारवाई करण्याचे अधिकार आहेत, तेच हा प्रकार करीत असल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात गोपनीय तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन शासनाच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचा हा प्रकार बंद करून होणारे नुकसान थांबावावे, अशी मागणी ही चरण वाघमारे यांनी केली.