नगर परिषदेचे सर्व विभाग आता एकाच छताखाली

26 Feb 2026 17:48:23
सर्वसाधारण सभेत २९ ठरावांना एकमताने मंजुरी
 
कारंजा लाड, 
Karanja Municipal Council कारंजा नगर परिषदेची दुसरी सर्वसाधारण सभा २६ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष फरिदाबानू पुंजाणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत नगर परिषदेचे विविध विभाग सध्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असल्यामुळे नागरिकांना होत असलेली गैरसोय लक्षात घेता सर्व विभागांचे कामकाज एकाच इमारतीत सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ठरावासह विविध विकासकामे व नागरी सुविधा पुरविण्यासंदर्भातील एकूण २९ ठरावांना बिनविरोध मंजुरी देण्यात आली.
 
 
karanja
 
नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित या सभेत त्यांच्या परवानगीने उपाध्यक्ष अ‍ॅड. फिरोज शेकुवाले यांनी सर्व ठरावांचे वाचन केले. सभेत मंजूर झालेल्या ठरावांमध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानला ‘अ’ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणे, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यांची रंगरंगोटी व स्वच्छता करणे, नगर परिषदेच्या शाळेत अंगणवाडी केंद्र सुरू करणे, हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानाच्या विकासासाठी निधी मागणी करणे, लेआउटमधील ओपन स्पेसवर ओपन जिम उभारणे, सांडपाण्यासाठी भुयारी गटार योजना राबविणे, वाढ क्षेत्रासाठी शासनाकडे निधीची मागणी करणे, वसाहतींचे सर्वेक्षण करून आवश्यक ठिकाणी पथदिवे बसविणे, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार्‍या बॅनरसाठी दर निश्चित करणे आदी मुद्द्यांचा समावेश होता. एमआयएम पक्षाचे सत्ताधारी तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधी गटातील नगरसेवकांनी सर्व ठरावांना एकमताने मंजुरी दिली.
 
 
Karanja Municipal Council सभेला एमआयएम पक्षाचे गटनेते बिलाल पुंजाणी , भाजपच्या गटनेत्या शालिनी ठाकरे यांच्यासह एमआयएमचे १८, भाजपचे १४, राष्ट्रवादी काँग्रेसचे १ व १ अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी अभिषेक परदेशी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रगीताने सभेची सुरुवात झाली. तर महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेची सांगता करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0