गडचिरोलीतील विद्यार्थी तेजस्वी : मुख्य सचिव राजेश अग्रवाल

26 Feb 2026 18:00:40
गडचिरोली, 
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील सहावीतील विद्यार्थ्यांचे मुंबईतील माझ्या निवासस्थानी स्वागत करताना मला अत्यंत आनंद झाला. ही मुले अत्यंत हुशार असून त्यांची स्वप्ने शिक्षक, डॉक्टर, ‘कलेक्टर’ किंवा ‘पोलिस अधिकारी’ होण्याची आहेत. गडचिरोलीतील मुले तेजस्वी आहेत. त्यांना सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि उत्कृष्ट शिक्षक मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. 'Mission Jinkuya' ‘मिशन जिंकूया’ या जिल्हा परिषद गडचिरोलीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या 20 विद्यार्थ्यांना ऐतिहासिक व शैक्षणिक सहलीसाठी मुंबई येथे विमानाने नेण्यात आले. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्री मुख्य सचिवांच्या निवासस्थानी भेट दिली, यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्य सचिवांनी त्यांच्या आत्मविश्‍वासाचे आणि जिद्दीचे विशेष कौतुक केले.
 
 
jdkslds
 
विद्यार्थ्यांनी यावेळी इतनी शक्ती हमें देना दाता हे प्रार्थनागीत सादर केले. मुख्य सचिवांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने उत्तरे दिली. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या मोठ्या स्वप्नांना त्यांनी मनापासून दाद दिली आणि शासनाच्यावतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या 'Mission Jinkuya' ‘मिशन जिंकूया’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षेची विशेष तयारी, तज्ज्ञ मार्गदर्शन, ओएमआर सराव तसेच परीक्षा शुल्क भरण्याची सुविधा दिली जाते. शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे सूक्ष्म नियोजनही या उपक्रमात केले जाते.
 
 
 
मुंबई दौर्‍यात विद्यार्थ्यांनी मंत्रालय व विधानभवन, गेटवे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी, नेहरू विज्ञान केंद्र आणि नेहरू तारांगण अशा महत्त्वाच्या स्थळांना भेट देत शैक्षणिक व ऐतिहासिक अनुभव घेतला. पुढीलवर्षी ‘मिशन जिंकूया’ उपक्रमांतर्गत शंभर विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्यात येणार असल्याचे तसेच ‘आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील एकूण 100 विद्यार्थ्यांना हैदराबाद व बंगलोर येथील रिसर्च सेंटरला विमानाने पाठवण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळेतील हे विद्यार्थी प्रथमच विमानाने जात आहेत. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत नवी उमेद निर्माण होत असून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढला आहे. 'Mission Jinkuya' ‘मिशन जिंकूया’मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने झेप घेण्यासाठी नवे बळ मिळाले असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0