छतावर उड्या, वाहनांची पाडापाड
अचलपूर,
शहरातील व्हीएचबी कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून माकडांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी चांगलाच हैदोस सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. संध्याकाळनंतर Monkeys माकडांचे टोळके कॉलनीत ठाण मांडून बसत असून, रात्री उशिरापर्यंत आरडाओरडा, धुमाकूळ आणि घरांमध्ये घुसखोरीचे प्रकार वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अचलपूर परतवाडा शहरात माकडांचा हैदोस सुरू आहे. ही माकडे कोणालाही न घाबरता थेट घरांमध्ये प्रवेश करून खाण्याच्या वस्तू, फळे, भांडी तसेच इतर साहित्य उचलून नेत आहेत. काही ठिकाणी गॅलरी, छत, खिडक्या व दरवाज्यांमधून माकडांनी घरात शिरल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून, लहान मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. शहरातील मध्यवस्ती असलेल्या मिल कॉलनी परिसरात माकडांनी जणू डेरा टाकला आहे. रात्रीच्या वेळेस अचानक माकडांची धावपळ व झुंबड सुरू होत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. वृद्ध नागरिक, महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, या प्रकारामुळे भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Monkeys या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत परतवाडा काँग्रेस अध्यक्ष राहूल गवई यांनी वन विभागाने तातडीने दखल घेऊन माकडांचा बंदोबस्त करावा, अशी ठाम मागणी केली आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, व्हीएचबी कॉलनीतील रहिवाशांकडून वन विभागाने या प्रकरणाची तातडीने पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माकडांच्या वाढत्या त्रासातून परिसर लवकरात लवकर मुक्त व्हावा, हीच कॉलनीवासीयांची प्रमुख मागणी आहे.