मद्यप्राशनानंतरच्या वादातून युवकाची हत्या

26 Feb 2026 22:04:50
आरोपी अटकेत
अमरावती,
Murder राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिशा बार जवळ बुधवारी रात्री झालेल्या एका तरुणाच्या हत्याकांडाचा छडा लावण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला अवघ्या सहा तासांत यश आले आहे. मद्यप्राशनानंतर झालेल्या क्षुल्लक वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी आरोपीला त्याच्या दुचाकीसह स्वावलंबी नगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
 
 
mur
 
माहितीनुसार, गोपाल नगर येथील रहिवासी शुभम किशोर ठाकरे याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात दोन व्यक्तींमध्ये वाद झाल्याचे समोर आले, मात्र आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नव्हती. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तत्काळ पथके रवाना केली. तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी अनूप दीपकराव पांडे (वय ४१) याला निष्पन्न केले. आरोपी हा मूळचा तिवसा तालुक्यातील दापोरी येथील असून सध्या अमरावतीच्या स्वास्तिक नगर येथे भाड्याने राहत होता. पोलिसांनी त्याला त्याच्या राहत्या घराबाहेरून प्लॅटिनम गाडीसह ताब्यात घेतले.
 
 
मद्यप्राशन आणि वाद
Murder  पोलिसी खाक्या दाखवताच अनूप पांडे याने गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनी सोबत दारू प्यायली होती. मद्यधुंद अवस्थेत असताना किरकोळ कारणावरून आमचा वाद झाला. याच वादातून रागाच्या भरात जवळ असलेल्या छोट्या चाकूने शुभमवर वार केले, अशी कबुली आरोपीने दिली आहे. विशेष म्हणजे, आरोपी अनूप पांडे याच्यावर यापूर्वी तिवसा पोलिस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सपोनि मनीष वाकोडे, महेश इंगोले आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Powered By Sangraha 9.0