नागपूर,
draupadi murmu उद्याेग, कृषी, नवाेपक्रम, उच्च शिक्षण आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा या सर्वांच्या बळावर महाराष्ट्राने देशाच्या प्रगतीला सातत्याने बळ दिले आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत थेट लाभ पाेहचेल अशा सर्वसमावेशक विकासाकडे भारताला वाटचाल करायची आहे. यासाठी इतिहासातून प्रेरणा घेऊन आणि आधुनिक तंत्रज्ञान, काैशल्यविकासाचा उपयाेग करून अधिक सक्षम आणि समृद्ध भारत घडविण्यासाठी संकल्पबद्ध हाेऊन कार्य करुया, असे आवाहन राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी केले.
महाराष्ट्रात सामाजिक एकता, परस्पर विश्वास आणि सकारात्मक मुल्ये बळकट करण्याच्या उद्देशाने ब्रह्ममाकमारीज संस्थेच्या वतीने आयाेजित ‘एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ राष्ट्रपतींच्या हस्ते आज जामठा येथील ब्रह्मकुमारीज विश्व शांती सराेवर येथे झाला. यावेळी त्या बाेलत हाेत्या. महाराष्ट्रासह देशाच्या सर्वांगीण विकासात एकता विकास आणि मुल्याधिष्ठित नेतृत्वाची गरजही त्यांनी अधाेरेखित केली.
याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ब्रह्मकुुमारी रजनीदिदी, चंद्रिकादिदी, मृत्यूंजयभाई आदी व्यासपीठावर उपस्थित हाेते. मनाेगतात राष्ट्रपती म्हणाल्या, ही भूमी राष्ट्रनिर्मितीच्या महान विचारांची आणि आदर्शांची जन्मभूमी राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर स्वा. सावरकरपर्यंत युगपुरुषांनी आपले विचारांनी व मुल्यांनी राष्ट्राला बळकटी दिली आहे. याच मानवी मुल्यांमुळे लाेक जागरूक आणि कर्तव्यनिष्ठ बनतात. ही मूल्ये जीवनाचा भाग बनतात, तेव्हा परस्पर विश्वासामुळे समाजात सकारात्मक आणि रचनात्मक कार्यांना चालना मिळत असल्याचे त्या म्हणाल्या एकता आणि विश्वासाची राष्ट्र उभारणीतील भूमिक मांडताना त्या म्हणाल्या, समाजात परस्पर विश्वास वाढला की लाेक वैयक्तिक फायद्यापलीकडे जाऊन सामूहिक उद्दिष्टांसाठी एकत्रितपणे काम करतात. आध्यात्मिक स्तरावर करुणा, सहिष्णुता आणि परस्पर आदराची भावना जाेपासली, तर समाजात सकारात्मक ऊर्जेचा प्रसार हाेताे. या अभियानातून या बाबी नक्कीच साध्य हाेतील असा विश्वास द्राैैपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.draupadi murmu तंत्रज्ञानाच्या या युगात जीवन तणावमुक्त हाेण्यासाठी या अभियानाचा फायदा हाेणार असल्याचे बावनकुळे आपल्या मनाेगतात म्हणाले.
राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अधिक मजबूत
सरकार राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेद्वारे विविध राज्यांमधील सांस्कृतिक आदानप्रदानाला प्राेत्साहन देण्यात आले आहे. डिजिटल इंडिया अभियानामुळे पारदर्शकता वाढली असून सेवांची उपलब्धता सुलभ झाली आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण, आराेग्य आणि काैशल्य विकासामध्ये गुंतवणूक करून समावेशक विकासाला गती दिली जात आहे. या सर्व प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास वाढताे आणि राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अधिक मजबूत हाेते, असा विश्वास मुर्मू यांनी व्यक्त केला.
एकता आणि विश्वास एकमेकांना पुरक - आचार्य देवव्रत
मनाेगतात राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, एकता आणि विश्वास हे एकमेकांना पुरक आहेत. एकात्मतेचा संदेश देणारी ब्रह्मकुमारी ही संस्था संपूर्ण विश्वाला मानवी मुल्यांसाठी साठी प्रेरित करीत आहेत. त्यामुळे या अभियानाची नितांत आवश्यकता असल्याचे ते यावेळी म्हणाले.