आनंदवार्ता...ताम्हिणी घाटासाठी पर्यायी मार्गाची योजना

26 Feb 2026 16:16:00
पुणे,
Tamhini Ghat alternative route, पुणे आणि कोकणाला जोडणारा निसर्गरम्य आणि सर्वात जवळचा मार्ग म्हणून प्रसिद्ध ताम्हिणी घाटाला आता सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. पावसाळ्यातील दरडींचे संकट, घाटातील अरुंद रस्ते आणि तीव्र वळणांमुळे होणारी वाहतूक कोंडी या समस्यांचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवीन बोगदा किंवा पर्यायी मार्गाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
 

Tamhini Ghat alternative route, Pune to Konkan highway project, 
ताम्हिणी घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध झाला, तर पुण्याहून दिघी पोर्ट आणि माणगाव औद्योगिक क्षेत्राशी संपर्क साधणे अधिक सोपे होईल. सध्या रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट येथे जाण्यासाठी पुणे–चांदणी चौक–पौड–ताम्हिणी–माणगाव–दिघी असा मार्ग वापरण्यात येतो. या रस्त्याला केंद्र सरकारने यापूर्वीच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे, परंतु घाटातील तीव्र वळणं आणि उंच डोंगराळ भागामुळे प्रवास वेळखाऊ ठरतो, तसेच जड वाहनांसाठी हा मार्ग अपायकारक ठरतो.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या समस्यांचा विचार करून दोन पर्याय पुढे ठेवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे ताम्हिणी घाट पार न करता पानशेत मार्गे माणगाव आणि तिथून दिघी पोर्टकडे जाणारा नवीन मार्ग तयार करणे. दुसरा पर्याय म्हणजे सध्याच्या घाट रस्त्याचे रुंदीकरण करणे, वळणे कमी करणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा मार्ग तयार करणे, ज्यामुळे प्रवास सुरक्षित आणि जलद होईल.प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घाटरस्त्याचे अंतर कमी करून प्रवास अधिक सुखकर करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी प्राथमिक माहिती जमा करण्याचे आणि नवीन मार्गाची आखणी करण्याचे काम तातडीने सुरू केले गेले आहे.
ताम्हिणी घाटात पावसाळ्यातील दरड कोसळण्याचे, तीव्र वळणांमुळे अपघात होण्याचे तसेच शनिवार-रविवारी पर्यटकांच्या गर्दीमुळे लांब रांगा लागण्याचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अरुंद असल्यामुळे मालवाहतुकीसाठी मोठ्या वाहनांना वळविण्यास अडचण येते, तसेच ओव्हरटेक करणेही अवघड होते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या घाटासाठी सुरक्षित आणि प्रभावी पर्यायी मार्ग निर्माण करण्याच्या प्रक्रियेत आहे.या प्रकल्पामुळे पुण्याहून कोकणात जाणारा प्रवास जलद होईल, पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि व्यापारिक विकासाला चालना मिळेल, तसेच घाटातील अपघात आणि वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0