नागपूर,
yogeshwar kirtan festival नागपूरमधील जयप्रकाश नगर परिसरातील श्रीराम हनुमान मंदिरात २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत त्रिदिवसीय योगेश्वर कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व .सिंधुताई सुधाकरराव आकांत चॅरिटेबल ट्रस्ट आणि जयप्रकाश नगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त पुढाकारातून हा धार्मिक सोहळा साकारला जात असून दररोज सायंकाळी सहा वाजता कीर्तनास प्रारंभ होणार आहे. उत्सवाचे भूमिपूजन दत्ता टेकाडे यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ह.भ.प. चारुदत्त बुवा आफळे ‘धर्म संस्थापक – युगंधर कृष्ण’ या विषयावर कीर्तन सादर करणार आहेत. दुसऱ्या दिवशी ह.भ.प. संदीपबुवा मांडके ‘रुक्मिणी स्वयंवर – आदर्श पती कृष्ण’ या विषयावर भावपूर्ण निरूपण करतील. समारोपाच्या दिवशी ह.भ.प. डॉ. अवंतिका टोळे (देशमुख) ‘गोकुळातील बाळगोपाळांचा कृष्ण’ या विषयावर कीर्तन सादर करणार आहेत.
या महोत्सवादरम्यान नागपूरातील निवडक कीर्तनकारांचा गौरव करण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी दक्षिणमूर्ती संस्थानचे ह.भ.प. मकरंदबुवा हरदास यांना ‘कीर्तनसाधना’ सन्मान प्रदान केला जाईल, तर बालकीर्तनकार ह.भ.प. देवव्रत देशपांडे यांना ‘कीर्तनकुमार’ म्हणून गौरविण्यात येईल.yogeshwar kirtan festival समारोपाच्या दिवशी ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मुकुंदबुवा देवरस यांना ‘कीर्तनतपस्वी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. या तीन दिवसीय भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी कीर्तनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.