शाळेचे भंगार परस्पर विकले
पुलगाव,
नजिकच्या Vijay Gopal Zilla Parishad School विजय गोपाल येथे जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दामोधर बुल्हे यांनी कुठलाही ठराव न घेता शाळेचे भंगार परस्पर विकून ८ हजार ५०० रुपयाची रक्कम हडप केली. हा प्रकार ग्रामस्थ महादेव चौधरी यांनी टाकलेल्या माहितीच्या अधिकारात पुढे आला. चौकशी होऊन आता अहवालाकडे सर्वांच्या नजरा आता लागलेल्या दिसून येत आहे.
शाळेचे भंगार हे सरकारी मालमत्ता आहे. अध्यक्ष, सदस्यांना विश्वासात न घेता त्यांनी ३१ जुलै २०२५ रोजी भंगार विकून ८ हजार ५०० रुपये बुल्हे यांनी तर १ हजार ५०० रुपये किशोर ताटू, गजानन घोटेकर यांनी हडप केल्याचे या माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले होते. भंगारातून आलेले पैसे सुद्धा शाळेला अजून जमा केले नसल्याची माहिती सुद्धा स्पष्ट झाली होती. त्यानंतर गावामध्ये हा प्रकार योग्य नाही आणि हा सरासरी भ्रष्टाचार आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोशींवर कारवाई करण्यात यावी अशी चर्चा सुद्धा रंगली होती. त्यानंतर तरुण भारतने सुद्धा वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच दोन ते तीन दिवसात या प्रकरणाची चौकशी करण्याकरता विजय गोपाल येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि आणि केंद्रप्रमुख आले होते. चौकशी समितीने आजी, माजी अध्यक्ष तसेच सर्व सदस्य आणि मुख्याध्यापकांचे बयान सुद्धा घेतले. त्याला अनुसरून आता या प्रकरणाचा अहवाल तयार करत असल्याचे समजले आहे. त्या अहवालाकडे गावकरी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. या संबंधित प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकरी आणि पालक वर्गात जोर धरू लागली आहे.
Vijay Gopal Zilla Parishad School चौकशीच्या दिवशी अध्यक्षांनी स्वतःला वाचवण्यासाठी गावातील काही नागरिक सुद्धा खोटं बोलून शाळेत बोलावले होते. परंतु, या प्रकरणाशी गावातील नागरिकांचा काहीच संबंध नसल्याने त्यांची इथे काहीच गरज नाही असे चौकशी समितीने तिथेच सांगून अध्यक्षांचा डाव उलटून लावल्याचे सुद्धा समजले. उद्या शुक्रवार २७ रोजी शाळा व्यवस्थापन समितीची पालक सभा असून या सभेत आम्ही आम्ही सर्व पालक या प्रकरणाची चर्चा करून शाळेच्या झालेल्या नुकसानाविषयी सुद्धा आम्ही बोलू, भ्रष्टाचारी अध्यक्ष शाळेला नको या विषयावर सुद्धा चर्चा करण्यात येईल अशी चर्चा पालकांमध्ये आहे.
प्रकरणाची चौकशी १९ रोजी जिप शाळा विजयगोपाल येथे जाऊन केली. या प्रकरणाशी संबंधित शाळा व्यवस्थापन समिती आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि मुख्याध्यापकांचे बयान सुद्धा घेतले. सध्या दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू असून शिक्षण विभागाचे सर्व विस्तार अधिकारी आणि कर्मचारी या परीक्षेत व्यस्त आहेत. संबंधित प्रकरणाचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसात आल्यावर बयानच्या आधारावर दोषींवर कारवाई सुद्धा होईल अशी माहिती देवळी पंसच्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी नेमाडे यांनी दिली.