पाकच्या १९ चौक्या उद्ध्वस्त; ५५ सैनिक ठार!

27 Feb 2026 12:16:37
काबुल,
19 Pakistani posts destroyed पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाने आता उघड संघर्षाचे रूप धारण केले असून दोन्ही देशांमधील तणाव अत्यंत तीव्र झाला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी उशिरा रात्री अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या सीमेलगतच्या अनेक लष्करी ठिकाणांवर जोरदार कारवाई केली. या कारवाईत ५५ हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा तसेच १९ लष्करी चौक्या नष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे. सहा वेगवेगळ्या भागांत एकाच वेळी हल्ले चढवण्यात आले असून पहाटेपर्यंत आणखी दोन क्षेत्रांमध्ये चकमकी सुरू झाल्याचे सांगितले जाते.
 
 
 
19 Pakistani posts
अफगाण प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी स्पष्ट केले की, २२ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानकडून झालेल्या हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ ही मोठी मोहीम राबवण्यात आली. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत चाललेल्या या कारवाईत तोफगोळे, रणगाडे आणि बहुनळी रॉकेट प्रक्षेपकांचा वापर केल्याचे नमूद करण्यात आले. पक्तिया-खुर्रम, कुन्नार-बाजौर, नांगरहार-खैबर तोरखम, खोस्त-मिरानशाह, पक्तिका-दक्षिण वझिरीस्तान तसेच नुरिस्तान-दीर या सीमाभागांमध्ये तीव्र लढाया झाल्याचा दावा अफगाणिस्तानने केला आहे. अफगाण लष्कराच्या २०३ व्या मन्सूरी तुकडी आणि २०१ व्या खालिद बिन वालिद तुकडीने ही मोहीम पार पाडल्याचे सांगितले गेले. लष्करप्रमुख मुहम्मद फसिहुद्दीन फिसरत यांनी नियंत्रण कक्षातून कारवाईवर देखरेख ठेवली. अफगाणिस्तानच्या मते, काही पाकिस्तानी सैनिकांना जिवंत पकडण्यातही यश आले आहे.
 
 
पहाटे साडेपाचच्या सुमारास स्पिन बोल्दाक-चमन आणि हेलमंद-बरमचा या भागातही चकमकी उसळल्या असून एकूण आठ क्षेत्रांत लढाई सुरू असल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानचा दावा आहे की त्यांच्या बाजूने केवळ आठ सैनिक ठार झाले आणि १३ जखमी झाले, तर कोणत्याही नागरिकांचा बळी गेला नाही. मात्र संघर्षाची ठिणगी २१ फेब्रुवारी रोजी पडल्याचे सांगितले जाते. त्या दिवशी पाकिस्तानने अफगाण भूमीवरील काही छावण्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर २६ फेब्रुवारीच्या रात्री अफगाणिस्तानने प्रत्युत्तर दिले आणि परिस्थिती आणखी चिघळली. डुरंड रेषा म्हणून ओळखली जाणारी वादग्रस्त सीमा हा दीर्घकाळापासूनचा वादाचा मुद्दा असला तरी आता त्याचे रूपांतर उघड युद्धात झाले आहे. गेल्या वर्षी कतारच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये युद्धविराम झाला होता, परंतु तो करार मोडीत निघाल्याने सीमाभाग पुन्हा रणांगण बनला आहे.
Powered By Sangraha 9.0