तभा वृत्तसेवा
मुंबई,
Besa Housing Society scam, बेसा नगर पंचायतीच्या हद्दीतील आनंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सचिवाने सार्वजनिक वापरासाठीची जागा संस्थेचे सदस्य नसलेल्यांना बेकायदेशीर विकल्याप्रकणी सहायक निबंधकाला निलंबित करण्याची घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत केली.
नागपूरच्या बेसा नगरपंचायतीच्या हद्दीत असलेल्या आनंद को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सचिव कैलास चूटे यांनी सार्वजनिक उपयोगासाठी असलेल्या जागेपैकी 11 हजार 107 चौरस फुट जागा स्वतःच्या आर्थिक लाभापोटी विकल्याबाबतचा तारांकीत प्रश्न सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. यावेळी सहकारमंत्र्यांनी सदर घोषणा केली.आ. आत्राम यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर सहकार मंत्र्यांनी आपल्या उत्तरात यात गैरव्यवहार झाल्याचे मान्य केले. यासर्व गैरव्यवहाराची चौकशी करुन यात दोषी असणाèयांवर कारवाई करण्याची ग्वाही दिली. मात्र, यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रकरणातील दोषी असलेल्या शासकीय कर्मचाèयांवर पहिले निलंबंनाची कारवाई करा आणि मग चौकशी करा अशी मागणी केली. तेव्हा सहकार मंत्र्यांनी सहायक निबंधकाला निलंबित करत असल्याची घोषणा केली. तर यात प्रथमदर्शनी नगर पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारीदेखील सहभागी असल्याचे निदर्शनात येत असल्यानं त्यांची चौकशीदेखील करण्यासंबंधाने नगर विकास विभागाकडे पाठविले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर, यासंपूर्ण प्रकरणाची एक महिन्यात चौकशी करुन, या गैरव्यवहार प्रकरणातील सर्व संबंधितांवर कारवाई केली जाईल, फौजदारी गुन्हे दाखल केले जाईल. असे, आश्वासन सहकार मंत्र्यांनी सभागृहात दिले.