अमली पदार्थ विक्रेता तरुणास अटक

27 Feb 2026 13:06:35
अनिल कांबळे
drug dealer arrested नागपूर, लकडगंज पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारावर इतवारी रेल्वे स्थानकाच्या मालधक्का परिसरात अंमली पदार्थाची विक्री करताना एका तरुणाला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांनी त्याला मालाचा पुरवठा करणाऱ्या तस्करालाही बेड्या ठोकल्या. अक्षय दिलीप चौधरी (३०) रा. मट्टीपुरा, जुनी मंगळवारी आणि सागर चौधरी (३०) रा. गंगाबाग, पारडी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
 
 
 
drug
 
बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास लकडगंज पोलिसांचे पथक ठाण्यांतर्गत गस्त घालत होते. या दरम्यान इतवारी रेल्वे स्थानकामागील मालधक्काकडे जाणाऱ्या मार्गावर काळ्या रंगाची शर्ट घातलेला एक तरुण अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी परिसराची घेराबंदी करून अक्षयला पकडले. झडतीमध्ये त्याच्याजवळ एक लाल रंगाची पिशवी मिळाली. त्यात पिशवीत झिपालॉक पाऊचमध्ये ८६.७२० ग्रॅम मेफेड्रान ड्रग्ज (एमडी पावडर) होते. पोलिसांनी अमली पदार्थासह आरोपीचा फोन आणि ईलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण ४ लाख ४३ हजार रुपयांचा माल जप्त केला. मालाबाबत चौकशी केली असता सागर चौधरी याने विक्रीसाठी उपलब्ध केल्याची माहिती अक्षयने दिली. त्यानंतर पोलिसांनी सागरच्या अड्ड्यावर धडक देऊन त्यालाही बेड्या ठोकल्या.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सागर अनेक वर्षांपासून अमली पदार्थाची खरेदी-विक्रीच्या धंद्यात सक्रीय आहे. यापूर्वीही पोलिसांनी त्याला अमली पदार्थाची विक्री करताना अटक केली होती. दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई वपोनि अरुण क्षीरसागर, पोहवा नीलेश घायवट, आनंद मरसकोल्हे, मनोहर झलके आणि प्रभाकर मानकर यांनी केली.
धंतोली पोलिसांनीही एकाला पकडले
धंतोली पोलिसांनीही बुधवारी रात्री गस्तीदरम्यान एका तरुणाला अमली पदार्थाची विक्री करताना अटक केली. स्वप्निल विलास आंबटकर (२४) रा. सुदामपुरी, सक्करदा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो कुंभार टोलीच्या नाल्याजवळील कबूतर खाना परिसरात दुचाकीवर अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.drug dealer arrested या माहितीच्या आधारावर पोलिस परिसरात पोहोचले असता स्वप्निल हा एमएच-४९/बीएन-१७३३ क्रमांकाच्या दुचाकी वाहनावर संशयास्पदरित्या आढळला. त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ ४ ग्रॅम एमडी पावडर मिळाले. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल, दुचाकी वाहन आणि अमली पदार्थ असा एकूण ५८ हजारांचा माल जप्त केला आहे. त्याला मालाचा पुरवठा करणाऱ्याचा शोध सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0