* पुण्यात मेस चालवून झाला होता कर्जबाजारी
* किडनी काढून हातावर ठेवले अवघे 5 लाख
* ‘त्रिचीच्या स्टार हॉस्पीटल’शीच धागेदोरे
चंद्रपूर,
नागभीड तालुक्याच्या मिंथूर गावातील अवैध सावकारी प्रकरणाच्या तपासातून 'kidney donor' किडनी तस्करीचे रॅकेट अवघ्या देशभर पसरले असल्याचे पुढे आले. या भयाण सापळ्यात महाराष्ट्रातील रोशन कु डे याच्यासह पुण्याचा संचजित कासवा हा 23 वर्षाचा तरूणदेखील अडकल्याचे आता उघडकीस आले आहे. कासवा हा मुळचा संभाजीनगरचा रहिवासी असून, तो सध्या पुण्याला राहतो.
समाजमाध्यमांवर जाहिरात करून कर्जबाजारी युवकांना 'kidney donor' किडनी विकण्यास बाध्य करणार्या या रॅकेटने संचजित कासवा यालाही हेरले. तामिळनाडू येथील त्रिचीच्या स्टार किम्स हॉस्पीटलमध्ये त्याची किडनी काढली गेली. अवघे 5 लाख रूपये देऊन त्याचीही बोळवण केली गेली. मुख्य दलाल रामकृष्ण सुंचूच्या अटकेनंतर आता हळूहळू एक एक ‘किडनी डोनर’ चंद्रपूरच्या ‘एसआयटी’शी संपर्कात येत आहेत. पीडित संचजित कासवा याचेही बयाण पोलिसांनी नोंदवले आहे. त्यामुळे स्टार किम्स हॉस्पीटलचा संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांच्याविरूध्द आणखी एक पुरावा हाती लागल्याची माहिती ‘एसआयटी’चे सदस्य तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.
संशयित भ्रमणध्वनी क्रमांक गवसला
त्रिची येथील डॉ. राजरत्नम गोविंदस्वामीला तामीळनाडूतील उच्च न्यायालयाने ‘ट्रांझीट रिमांड’ दिल्यानंतर त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूरच्या न्यायालयात हजर व्हायचे होते. मात्र, तो हजर झाला नाही. आता ‘एसआयटी’ त्याला शोधत आहे. दरम्यान, तामिळनाडू राज्यातील एक संशयित भ्रमणध्वनी क्रमांक पोलिसांच्या हाती लागला असून, गोविंदस्वामीला शोधण्यासाठी पथक तिकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे.
4 मार्चला डॉ. सिंगचा जामीन रद्द होण्याची पोलिसांना आशा
आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग याच्याही जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात येत्या 4 मार्चला सुनावणी होणार आहे. यावेळी त्याचा जामीन रद्द होईल, अशी अशा पोलिसांना आहे. कारण आता ‘थोटा’ कायद्यांतर्गतही कारवाईचे अधिकारी ‘एसआयटी’कडे आले आहेत.