मेळघाटात दुर्मिळ वन्यजीव सहजीवनाची नोंद

27 Feb 2026 21:22:57
लांडगा व रानकुत्र्यांमध्ये मैत्री
अमरावती, 
Melghat Tiger Reserve मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एक अत्यंत दुर्मिळ आणि अभ्यासकांना आश्चर्यचकित करणारी घटना नोंदवण्यात आली आहे. भारतीय राखाडी लांडगा आणि आशियाई रानकुत्रे (ढोल) या दोन भिन्न प्रजातींमध्ये मैत्रीपूर्ण सहवास आढळून आला असून, विशेष म्हणजे या कळपाचे नेतृत्व एका प्रौढ लांडग्याकडे असल्याचे आढळून आले. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. सावन देशमुख यांना भारतीय लांडगा आणि चार रानकुत्रे (ढोल) एकत्र फिरताना आढळून आले.
 
 
tiger
 
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, भारतीय उपखंडातील सर्वात मोठ्या सामाजिक कॅनिड प्रजातींमध्ये गणल्या जाणार्‍या लांडगा आणि ढोल यांचे अधिवास पारंपरिकरीत्या वेगवेगळे असतात. लांडगे प्रामुख्याने मोकळी माळराने, शुष्क गवताळ कुरणे तसेच कृषी-पशुपालक भागात आढळतात, तर रानकुत्रे दाट पानझडी आणि सदाहरित जंगलांमध्ये वास्तव्य करतात. अश्या प्रकारचा प्रसंग भारतीय वन्यजीव अभ्यासात केवळ तिसर्‍यांदाच आढळून आलेला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तर हि पहिलीच नोंद असल्यामुळे मेळघाटचे वन्यजीव संरक्षणतले महत्व अधोरेखित झाले आहे.
 
 
Melghat Tiger Reserve  या दोन्ही प्रजातींमध्ये सहसा परस्पर सहवास टाळण्याकडेच भर असतो. मात्र मेळघाटातील या ताज्या निरीक्षणात कोणतीही आक्रमकता, गुरगुरणे किंवा झेप घेण्यासारखे वर्तन दिसले नाही. उलट, डॉ. सावन देशमुख यांनी सुमारे ४० मिनिटे हा गट एकत्रितपणे शांतपणे हालचाल करत असल्याचे अतिशय महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यातील सर्वात विशेष बाब म्हणजे म्हणजे लांडगा अग्रभागी राहून कळपाच्या हालचालीचे नेतृत्व करत असल्याचे स्पष्ट दिसले. मेळघाटातील ही घटना वन्यजीव संवर्धन आणि आंतरप्रजाती वर्तन अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. डॉ. देशमुख या विषयातील तज्ज्ञ अभ्यासकांच्या संपर्कात असून या अतिशय दुर्मिळ नोंदीची अधिक चिकित्सा आणि संशोधन करीत आहे. तसेच या संबंधी लवकरच वैज्ञानिक नियतकालिकात ते शोध निबंध प्रकाशित करणार आहे.
Powered By Sangraha 9.0