नागपूर,
Nandanvan Matru Seva Sangh School मातृसेवा संघ संचालित नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, सिताबर्डी येथे शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कामाच्या ठिकाणी निर्माण होणारा ताण कसा हाताळावा आणि मानसिक दडपणावर प्रभावी नियंत्रण कसे मिळवावे या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला होता. या कार्यशाळेत नंदनवन दुर्बल मनस्क मुलांची शाळा, नंदनवन संरक्षित कर्मशाळा लक्ष्मीनगर तसेच स्नेहांगन दिव्यांग मुलांची शाळा, सिताबर्डी येथील विशेष शिक्षक, कला शिक्षक आणि निदेशक सहभागी झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना आणि दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

मार्गदर्शक म्हणून तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. शिल्पा पुराणिक आणि डॉ. शिल्पा जिबलकर यांनी उपस्थितांना अत्यंत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने ताण-तणाव व्यवस्थापनाच्या विविध अंगांवर मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कृतीतून ताण कसा ओळखावा आणि त्यावर उपाययोजना कशा कराव्यात याचे मार्गदर्शन त्यांनी केले. या प्रसंगी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शामली पाराशर, नंदनवन संरक्षित कर्मशाळेच्या अधिक्षिका रंजना सुखदेवे तसेच स्नेहांगन दिव्यांग मुलांची शाळेच्या मुख्याध्यापिका मृणालिनी देशमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समाजसेविकानिलिमा बेलसरे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.