रिंकूच्या वडिलांची अपूर्ण इच्छा; घरात लग्नाऐवजी शोककळा

27 Feb 2026 12:34:36
अलीगड,
Rinku's father's unfulfilled wish अलीगडमधील एका साध्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग यांच्या वडिलांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून घरात लग्नसोहळ्याची उत्सुकता असताना अचानक शोककळा पसरली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांना यकृताच्या कर्करोगाचा चौथा टप्पा असल्याचे स्पष्ट झाले होते. प्रकृती अत्यंत खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रावर ठेवण्यात आले होते; मात्र उपचारांनंतरही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या रिंकूचा प्रवास संघर्षमय राहिला. अलीगडमध्ये त्यांचे वडील घरगुती गॅसचे सिलिंडर पोहोचवण्याचे काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मर्यादित साधनसंपत्ती असूनही मुलांच्या शिक्षणासाठी आणि स्वप्नांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. रिंकूला लहानसहान कामे करावी लागत असत; पण क्रिकेटपटू होण्याचा निर्धार त्याने सोडला नाही. सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले आणि कुटुंबाचे अनेक स्वप्ने पूर्ण केली.
 
 

Rinku 
मात्र एक इच्छा अपूर्णच राहिली. वडिलांना मुलाचे लग्न पाहण्याची आणि त्याच्या डोक्यावर सेहरा बांधलेला पाहण्याची मनापासून इच्छा होती. लग्नसोहळ्याची तयारी सुरू असतानाच नियतीने वेगळेच वळण घेतले. रिंकूचा विवाह समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी ठरला होता. सुरुवातीला सोहळा नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार होता; परंतु क्रिकेटमधील व्यस्त कार्यक्रमामुळे तो पुढे ढकलण्यात आला. नंतर जून महिन्यात लग्नाची चर्चा रंगली होती. कुटुंबात आनंदाचे दिवस यायचे होते; परंतु त्याआधीच वडिलांचे निधन झाले. ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अलीगड येथील घरी आणण्यात आले असून अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची बातमी मिळताच रिंकू सिंग विश्वचषक स्पर्धेदरम्यान तातडीने घरी परतला होता. पुढील सामन्यांसाठी तो पुन्हा संघात सहभागी होईल की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. कुटुंबावर आलेल्या या दु:खामुळे रिंकू सिंग यांच्यावर शोककळा पसरली आहे आणि अपूर्ण राहिलेल्या वडिलांच्या इच्छेची वेदना त्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.
Powered By Sangraha 9.0