तत्परता व योग्य उपचाराने अवघ्या दीड महिन्याच्या चिमुकल्याची वाचली दृष्टी

28 Feb 2026 18:51:36
गडचिरोली, 
अवघ्या 1.05 महिने वयाच्या मुदतपूर्व जन्मलेल्या बालकावर नागपूर येथे यशस्वी उपचार करून त्याची दृष्टी वाचवण्यात आरोग्य विभागातील डीईआयसी  (District Early Intervention Center) (जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र) ला यश आले आहे. या बालकाने मृत्यू आणि अंधत्वाशी दिलेली झुंज डॉक्टर आणि कर्मचार्‍यांच्या योग्य नियोजनामुळे यशस्वी ठरली आहे.
 
 
balak
 
येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात कमी दिवसाचे आणि कमी वजनाचे संबंधित बालक गेल्या दीड महिन्यापासून एसएनसीयु अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. आईच्या पोटात नऊ महिने पूर्ण न घेता सहाव्या महिन्यातच मुदतपूर्व जन्मामुळे अशा बालकांमध्ये रोप म्हणजेच डोळ्यांच्या पडद्याचा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. डीईआयसी मार्फतीने नियमित होणार्‍या आरओपी तपासणीमध्ये या बालकाची रेटीना तज्ञ डॉ. अंकिता अप्पलवार यांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी केली. बाळाच्या जन्मापासून तब्बल 7 वेळा ही तपासणी करण्यात आली. दुर्दैवाने, प्रत्येक तपासणीत बाळाच्या डोळ्यांची परिस्थिती खालावताना दिसत होती आणि बाळ ‘रोप पॉझीटीव्ह’ आढळले.
 
 
(District Early Intervention Center) आव्हानात्मक परिस्थितीत बाळाला तातडीने उच्च उपचारांची गरज होती. परंतु प्रकृती स्थिर नसल्यामुळे त्याला मोठ्या केंद्रात हलवणे धोक्याचे होते. अखेर 20 फेब्रुवारी रोजी बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत पेंदाम यांना बाळाची प्रकृती स्थिर झाल्याचे लक्षात येताच बाळाला डीईआयसी व एसएनसीयु मार्फतीने विलंब न लावता उच्चस्तरीय विशेषज्ञ सेवेकरिता संदर्भित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. बाळाची प्रकृती स्थिर होताच डीईआयसीच्या ऑप्टोमेट्रिस्ट नम्रता मुंजमकर यांनी बाळाला सुरक्षितपणे नागपूरला नेण्याची जबाबदारी पार पाडली व डीईआयसी करिता तृतीयस्तरीय संदर्भसेवेसाठी राज्य स्तरावरून सामंजस्स करार असलेले सारक्षी नेत्रालय नागपूर येथे हलवण्यात आले. तिथे डोळ्याच्या रेटीना शल्य चिकित्सक तज्ञ डॉ. शिल्पी नारनवरे यांनी बाळाच्या डोळ्यांवर योग्य ते उपचार करून त्याची दृष्टी वाचवण्यात यश मिळवले.
 
 
बाळ सुखरूप एसएनसीयुमध्ये परत आला असून 27 फेब्रुवारी रोजी डीईआयसी मार्फतीने नियमित होणार्‍या आरओपी तपासणीमध्ये सदर बालकाचे दोन पाठपुरावे पूर्ण झाले व बाळाचे डोळे व्यवस्थित आहेत. वेळेवर झालेले निदान व मिळालेले उपचार यामुळे या बालकाची दृष्टी वाचविल्याने बाळाचे निश्‍चितच भविष्य उजळणार आहे. या यशस्वी कामगिरीमागे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी कीलनाके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संपूर्ण वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुदतपूर्व जन्मलेल्या मुलांमध्ये डोळ्याच्या आरओपी (रेटिनोपथी ऑफ प्रीमचुरीटी) चा धोका असतो. योग्य वेळी स्क्रीनिंग आणि वेळेत उपचार मिळाल्यास अंधत्व टाळता येते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
Powered By Sangraha 9.0