कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत

28 Feb 2026 18:48:24
गडचिरोली, 
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पोर्ला शाखेचा भोंगळ कारभार आणि अधिकार्‍यांची असंवेदनशीलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. एका कोमात गेलेल्या वृद्ध महिलेला पैशांसाठी चक्क चारचाकी वाहनाने बँकेच्या दारात आणण्याची वेळ आली. या प्रकारामुळे बँकेच्या अधिकार्‍यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात असून, संबंधित व्यवस्थापकाची तत्काळ बदली करण्याची मागणी जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काटली येथील रहिवासी Shantabai Mankar शांताबाई मानकर या मागील काही दिवसांपासून कोमात आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याने त्यांची मुलगी व जावई 25 फेब्रुवारी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पोर्ला येथे गेले होते. त्यांनी वृद्धेच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे काढण्याची विनंती केली. मात्र, शाखा व्यवस्थापकाने खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे देणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेत त्यांना परत लावले.
 
 
dksl
 
खातेदार गंभीर आजारी असेल, तर बँकेने मेडिकल सर्टिफिकेट मागविणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता Shantabai Mankar  कोमात असलेल्या महिलेला बँकेत आणण्यास भाग पाडले गेले. शेवटी हतबल नातेवाइकांनी किरायाची गाडी करून वृद्धेला बँकेत नेले. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वीच याच बँकेतील एका कर्मचार्‍याने वसा येथील रहिवासी असलेल्या एका खातेदाराचे पैसे बनावट सही करून काढून घेतले होते. संबंधिताने तक्रार केल्यानंतर त्याचे पैसे परत केले. या प्रकारामुळे येथील विश्‍वास राहिलेला नाही. येथील अधिकार्‍यांच्या उद्धटपणामुळे खातेदार प्रस्त झाले आहेत. पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असलेल्या सर्वच अधिकार्‍यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खातेदार त्रस्त झाले आहेत. येथील तीनही अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात शाखा व्यवस्थापक मीरा कुळमेथे यांना विचारले असता, शांताबाई मानकर यांच्या नातेवाइकांना मेडिकल सर्टिफिकेट आणण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी खातेदारालाच वाहनाने आणले असल्याचे सांगीतले.
ग्रामसभेत बदलीचा ठराव
पोर्ला शाखेचे व्यवस्थापक आणि उपशाखा व्यवस्थापक यांची वागणूक सर्वसामान्य खातेदारांशी अत्यंत असभ्य असल्याची तक्रार नागरिक वारंवार करत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी झालेल्या पोर्ला ग्रामसभेत या बँक अधिकार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, असा ठराव सर्वानुमते मंजूर केले आहे. मात्र, उच्च पदस्थ बैंक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
Powered By Sangraha 9.0