पांढरा नव्हे तपकिरी कापूस!

28 Feb 2026 11:20:08
वेध
रेवती जोशी-अंधारे
brown cotton आपल्या देशात कापूस उत्पादनाचा उण्यापुऱ्या पाच हजार वर्षांचा इतिहास आहे आणि विदर्भाच्या 11 जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे तर कापूस हब आहेत. केवळ पांढराच नाही तर कथ्था, हिरवा आणि फिकट गुलाबी रंगाचा कापूस भारतात तयार होत असे. त्यात विविध रंगसंगती करून दर्जेदार कापड निर्मिती होत असे. यांत्रिक शोधांच्या क्रांतिकारी प्रवाहात स्थानिक बियाणे आणि शेतकऱ्यांचे कौशल्य मागे पडून, पांढèया कापसाला विविध रंगांचा डाय करणे अंगवळणी पडले आहे.
 
 
 
 
कापूस
 
 
कापड उद्योगांमध्ये सर्वाधिक पाणी कापडाला विशिष्ट रंग देण्यासाठी वापरलं जातं. जगातील औद्योगिक जल प्रदूषणाच्या 20 टक्के प्रदूषणासाठी हा उद्योग जबाबदार आहे. शिवाय, जगातील एकूण कार्बन उत्सर्जनापैकी 10 टक्के उत्सर्जन या उद्योगांतून होतं. युनायटेड नेशन्स इनव्हायर्नमेंट प्रोग्रामनुसार, शेतातील कापूस ते तयार जीन्स पँट या प्रवासासाठी तब्बल 3781 लिटर पाणी लागतं. हे 33.4 किलोग्रॅम कार्बन उत्सर्जनाच्या बरोबर आहे. एका जीन्स पँटला इतकं एकूण कापड उद्योगासाठी किती पाणी खर्च होत असेल? अमेरिकेतील नॉन प्रॉफीट रिसर्च सेंटर, वर्ल्ड इन्स्टिट्यूटच्या मते, कापड उद्योगांना दरवर्षी कापड रंगविण्यासाठी अंदाजे पाच ट्रिलियन लिटर पाणी लागतं.
 
हे रसायनयुक्त डाय मिश्रित प्रदूषित आणि बहुतांश वेळा कोणतीही प्रक्रिया न करता नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडले जाणारे पाणी प्रदूषण सोबत घेऊन प्रवाहित होत राहते. पण, रंगीत कापडासाठी आपण निसर्गावर प्रदूषणाचं काळं फासतोय, याचा विसर पडला. पण, नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन केंद्रातील संशोधकांनी मात्र याची आठवण ठेवून कापड निर्मितीला इको फ्रेंडली करण्यासाठी दमदार पाऊल टाकले. कापड उद्योगातील हे प्रदूषण कमी करण्यासाठी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. विनीता गोतमारे आणि त्यांच्या चमूने शेतात थेट रंगीत कापूसच पिकविण्याचे यशस्वी संशोधन केले आहे. गेल्या 25 वर्षांपासून कापसाच्या विविध वाणांवर संशोधन करणाèया डॉ. विनीता यांनी कपाशीच्या जंगली प्रजातींचा वापर करून नैसर्गिकरीत्या तपकिरी (ब्राऊन) रंगाच्या कापसाचं वाण शोधून काढलं आहे. रंगीत कापसाचे चार भारतीय वाण सध्या हातात आले असून त्याचं बियाणं शेतकऱ्यांनाही देण्यात आले आहे. विशेष म्हणजे वर्धेसह दक्षिण भारतात त्यापासून कापड तयार केलं जात आहे.
 
कापसाच्या जंगली वाणासोबत क्रॉसिंग करून नवीन प्रकारचं वाण तयार करताना रंगीत कापसाचे काही डेरिव्हेटिव्हज त्यांना मिळाले. या रंगीत कापसाचं व्यावसायिक महत्त्व बघता त्याला स्टेबल करणं गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन रंग फिका पडू नये यासाठी त्यांचे भगीरथ प्रयत्न सुरू झाले. त्यांनी हिरूसुटम, थर्बेरी, बारबाडन्स आणि रायमोंडी या जंगली जातींचा क्रॉस करून त्यामधून प्रोजिन्स मिळविले. डॉ. गोतमारे आणि कापूस संशोधन संस्थेच्या टीमने वर्ष 2013 मध्ये वैदेही 95 जेनेटिक स्टॉक म्हणून रजिस्टर केला. हे वाण खूप गडद तपकिरी रंगाचे आहे. त्यानंतर पहिलं वाण रिलिज व्हायला 2021 उजाडलं. यासाठी जवळपास 25 वर्षे लागली. जगभरात काही देशांमध्ये असे रंगीत कापूस शोधलेले आहेत. हे भारतीय रंगीत कापसाचे वाण जंगली जातींपासून मिळविलेले आहेत आणि हेच याचं वेगळेपण आहे. सध्या कापूस संशोधन संस्थेच्या जमिनीवर याचं उत्पादन घेतलं जातं. सेंद्रिय शेती करणाèया काही शेतकऱ्यांनाही त्यांनी बियाणं दिले आहे. कारण या कापसाला रासायनिक फवारणीची गरज नाही.brown cotton पांढऱ्या कापसापेक्षा याचं उत्पन्न कमी असले, तरी सेंद्रिय फवारणीमध्येच याचे उत्पन्न होते. तपकिरीला पांढèया कापसापेक्षा जास्त भाव मिळतो. माणसाकडून पर्यावरणाची होणारी हानी कमी करण्यासाठी हा कापूस अतिशय महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचे आणखी रंगीत कापूस आल्यास टेक्सटाईल इंडस्ट्रीमधील प्रदूषण कमी होईल.
 
प्रदूषण थांबविण्यासाठी रंगीत कापूस महत्त्वाचा मानला जातो. कारण कापसाच्या उत्पादनासाठी फक्त पावसाच्या पाण्याची गरज असते. नंतर या कापसापासून कापड तयार होईपर्यंत याला कुठल्याही रसायनाची किंवा पाण्याची गरज नसते. हा कापूस नैसर्गिकरीत्या रंगीतच असल्याने कुठल्याही प्रकारचा डाय करायची किंवा धुवायला ब्लिंचिंगची गरज नाही. या पर्यावरणस्नेही कापसाचा प्रचार-प्रसार वाढायला निश्चित धोरणाची गरज आहे. मायबाप सरकारने संशोधकांच्या प्रयत्नांना समर्थ हातभार लावला तर शेतकरीही कापूस पिकविण्यासाठी पुढाकार घेतील.
सध्या उत्पादित होणारा हा रंगीत कापूस फक्ततपकिरी रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये वेगवेगळे शेड्स आहेत. विदर्भाच्या उन्हात या कापसाचा रंग फिका न पडता आणखी गडद होतो, असं डॉ. विनीता यांच्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. तपकिरी रंग स्टेबल करण्यात यश मिळालं. आता इतर रंग स्टेबल करून त्या रंगाचा कापूस घेता येईल का? यावर डॉ. विनीता आणि त्यांच्या पूर्ण चमूचे संशोधन सुरू आहे. हा तपकिरी कापूस सध्या फक्त हातमागासाठी वापरला जातो. कारण याच्या लांबी-रुंदीच्या मर्यादा आहेत. त्यामध्ये सुधारणा करून हाय स्पीडमशिनसाठी हा कापूस कसा वापरता येईल, यासाठीच्या डॉ. गोतमारे यांच्या संशोधनाला लवकरच यश मिळेल. भविष्यात आणखी सुधारित वाण तयार झालं तर पर्यावरणाच्या दृष्टीनं नव्या भारतातील आमूलाग्र बदलांची ती नांदीच ठरणार आहे.
 
9850339240
:ःःःःःःःःःःः
Powered By Sangraha 9.0