वर्धा,
आईचे पेन्शन मिळविण्यासाठी न्यायालयात केस करायची आहे, असे म्हणून दोघांनी सेवानिवृत्त शिक्षकाची तब्बल ६२ लाख ७० हजार रुपयांनी Fraud फसवणूक केली. ही घटना कला लॉन, म्हसाळा येथे उघडकीस आली. कला लॉन परिसरातील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक शुद्धोधन धनवीज (६१) यांना चेतन लगड रा. दहेगाव (गो.), ह. मु. इंजापूर याने माझ्या आईची पेन्शन मिळविण्यासाठी कोर्टात केस करायची आहे, यासाठी पैशाची मागणी केली होती. यात त्याचा मित्र अक्षय लेंडे रा. इंजापूर हा सुद्धा सहभागी होता.
Fraud शुद्धोधन धनवीज यांनी त्याच्यावर विश्वास ठेवत २२ सप्टेंबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ पावेतो रोख ७० हजार, बँकेच्या खात्यातून १३ लाख ३६ हजार, बँकेच्या दुसर्या खात्यातून ८ लाख १४ हजार, फोन पेद्वारे ५३ हजार, फोन पे द्वारे ६७ हजार, पुन्हा रोख ३९ लाख ३० हजार, असे वेळोवेळी ६२ लाख ७० हजार रुपये दिले होते. शुद्धोधन धनवीज यांनी चेतन लगड याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने वेळोवेळी धनादेशाच्या स्वरुपात १.७३ कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा केल्याचे बँकेची बनावट पावती, रिझर्व बँक ऑफ इंडिया, रेल्वे मध्ये केस सुरू असल्याचे बनावट कागदपत्रे त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविले. परंतु, बँकेत पैसेच जमा न झाल्याने धनवीज यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता सर्व बनावट असल्याचे लक्षात आले. आपली Fraud फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.