गोंदियात पदपथ गिळंकृत, रस्ते खड्ड्यात

28 Feb 2026 18:58:30
वाहतूक कोंडी, अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग आणि अपुर्‍या नियोजनामुळे नागरिक त्रस्त

गोंदिया, 
Gondia city transport गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठा आणि प्रमुख मार्ग आज अतिक्रमण, खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले आहेत. पदपथांचा पूर्णपणे बळी गेला असून, दुकाने, हातगाड्या व फेरीवाल्यांनी त्यावर कब्जा केल्याने पादचार्‍यांना अक्षरशः जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागत आहे. शहरातील वाढत्या अराजकतेकडे स्थानिक प्रशासनाने डोळेझाक केल्याचा संताप नागरिकांमध्ये उफाळून येत आहे.
 
 
vahatuk
 
जयस्तंभ चौक, दुर्गा चौक, गांधी चौक, सिव्हिल लाईन, जयस्तंभ ते रेल्वे स्टेशन मार्ग, गोरेलाल चौक, नेहरू चौक, मनोहर चौक, गणेशनगर आदी भागांत पदपथांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. पादचार्‍यांसाठी असलेली जागा व्यापारी उपक्रमांनी व्यापल्याने सामान्य नागरिकांना वाहत्या वाहनांमधून मार्ग काढावा लागत आहे. परिणामी अपघातांचा धोका लक्षणीय वाढला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर हातगाड्या, भाजी व फळ विक्रेते, कपड्यांचे स्टॉल्स आणि किरकोळ दुकाने रस्त्याच्या मध्यापर्यंत उभी राहत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहने कोंडीत अडकून तासन्तास थांबावी लागतात. नगर परिषदेकडून वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहिमेच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात कारवाईचा मागमूसही दिसत नाही. काही दिवसांची प्रतीकात्मक कारवाई आणि त्यानंतर पुन्हा पूर्ववत स्थिती, असा ‘दिखावूपणा’ नागरिकांच्या नाराजीचे कारण ठरत आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, रात्रीच्या वेळी ते अपघातांना आमंत्रण देत आहेत. दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
 
 
 
Gondia city transport  पावसाळ्यानंतर रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती होणे अपेक्षित असताना, तात्पुरत्या डागडुजीवरच समाधान मानले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची टीकाही होत आहे. अरुंद रस्ते, बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमणामुळे शहरात दिवसभर वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही वेळेत मार्ग मिळत नसल्याचे गंभीर वास्तव आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना रोजच धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पदपथ तातडीने मोकळे करावेत, अतिक्रमणावर कठोर व सातत्यपूर्ण कारवाई करावी, रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी ठोस व शाश्वत आराखडा जाहीर करावा, अशी मागणी नागरिक, सेवाभावी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असून शहरातील वाढती अराजकता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता प्रशासनासाठी ‘परीक्षेची घडी’ ठरत आहे. घोषणांपेक्षा कृतीला प्राधान्य देत ठोस निर्णय घेतले जातील का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
प्रशासनाची जबाबदारी की केवळ घोषणाबाजी?
सम-विषम पार्किंग, एकेरी वाहतूक आणि अतिक्रमण हटावाच्या घोषणा केल्या जात असल्या तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनावरील विश्वास डळमळीत झाला आहे. शहर नियोजनाचा अभाव आणि समन्वयाची कमतरता यामुळे शहरात परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.
Powered By Sangraha 9.0