पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या प्रयत्नाचे फलित
वर्धा,
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे सेलू तालुयातील नागरिकांना होळीच्या शुभ पर्वावर विकासाचा रंग उडवल्या जाणार आहे. सेलू येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीस व तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाला राज्य सरकारने हिरवा झेंडा दाखवला आहे. सेलू तालुयाचे ठिकाणी असल्याने येथे न्यायालय असावे, जेणे करून नागरिकांना जिल्हा मुख्यालयी यावे लागू नये, यासाठी दिवाणी न्यायालय मंजूर करण्यात आले होते. मात्र न्यायालयासाठी इमारत नसल्याने न्यायालयाचे कामकाज भाड्याच्या इमारतीमधून चालत होते. या इमारती जीर्ण व जुनी असल्याने प्रशासकीय कामकाज करताना अनेक अडचणी येत होत्या. परिणामी, नागरिकांना सोयी सुविधा पुरविताना अडचण येत होती. इमारत न्यायाधिश, कर्मचारी व अभ्यासगत यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने नवीन इमारतीची निकड निर्माण झाली होती.
सेलू तालुयाचे मुख्यालय असून सिंदी सारखे मोठे शहर व १०० च्या आसपास गावे तालुयात असल्याने न्यायालयीन कामकाजासाठी नागरिकांची दररोज येथे गर्दी असते. तथापि, सेलू येथे न्यायालयाची स्वतंत्र इमारत असावी, यासाठी Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेत तसा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. बांधकाम विभागाने ४७.७२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून तांत्रिक सहमती घेऊन प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे सादर केला. या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सेलू न्यायालयाच्या इमारतीचा ४७.७२ कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. सेलू तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या मजल्याच्या बांधकावर १४ कोटी १६ लाख ९३ हजार रुपये खर्च होणार आहे. दिवाणी न्यायालय, तहसील कार्यालयाच्या प्रथम मजल्याच्या बांधकाम या दोन्ही मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ना. डॉ. पंकज भोयर यांनी आभार मानले.