इराणचे जोरदार प्रत्युत्तर...खाडी देशांतील अमेरिकन तळांवर हल्ले

28 Feb 2026 14:52:15
तेहरान,
Iran's strong response पश्चिम आशियातील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून इराणने बहरीन, कतार, कुवेत आणि संयुक्त अरब अमिराती येथे असलेल्या अमेरिकाच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले चढवले आहेत. त्यापूर्वी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर व्यापक हवाई कारवाई केली होती. या मोहिमेत अत्याधुनिक लढाऊ विमाने सहभागी झाली होती आणि राजधानी तेहरानसह विविध भागांतील सुमारे तीस लक्ष्यांवर एकाच वेळी प्रहार करण्यात आला.
 

Iran war 
 
या कारवाईनंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सुरक्षेच्या कारणास्तव गुप्त स्थळी हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणुशक्ती बनू दिले जाणार नाही, अशी ठाम भूमिका व्यक्त केली. इराणने अमेरिकेच्या प्रस्तावांना नकार दिल्यानंतर हा लष्करी पर्याय स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इराणमधील काही महत्त्वाच्या अणुसुविधांवरही लक्ष्य साधल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
 
 
दरम्यान, इराणने इस्रायलवर तीसहून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. या संघर्षात येमेन आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनाही इराणच्या बाजूने उभी राहिल्याची माहिती समोर आली आहे. बहरीनमधील अमेरिकन तळावर प्रहार झाल्याची पुष्टी करण्यात आली असून कतारमधील अमेरिकन तळ रिकामा करण्यात आल्याचे वृत्त आहे. संयुक्त अरब अमिरातीतील नौदल तळालाही लक्ष्य करण्यात आले आहे. सततच्या कारवायांमुळे संपूर्ण प्रदेशात तणावाचे सावट पसरले आहे. दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्याने संघर्ष अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी परिस्थिती अजूनही चिघळलेली आहे.
Powered By Sangraha 9.0