एल अल्टो,
Military plane crashes in Bolivia चलनी नोटांची वाहतूक करणाऱ्या बोलिवियाच्या लष्करी विमानाचा एल अल्टो शहराजवळ भीषण अपघात होऊन किमान पंधरा जणांचा मृत्यू झाला असून तीस जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. २७ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राजधानी ला पाजजवळील विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच वायुदलाचे हरक्युलिस सी-१३० हे मालवाहू विमान अनियंत्रित झाले. धावपट्टी ओलांडून ते सुरक्षा जाळी फोडत थेट महामार्गावर आदळले आणि क्षणात पेट घेतल्याने परिसर धुराच्या लोटांनी व्यापला.
या विमानातून देशातील दुसऱ्या भागात नव्या चलनी नोटा नेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर नोटा रस्त्यावर विखुरल्या गेल्या, तर अनेक जळून खाक झाल्या. विमान महामार्गावर घुसल्यामुळे काही वाहनांनाही धडक बसली आणि त्यांचेही मोठे नुकसान झाले. दुर्घटनेनंतर विमानतळ तात्काळ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या विमानात एकूण किती जण होते याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. वायुदलाकडूनही या घटनेविषयी सविस्तर निवेदन देण्यात आलेले नसून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.