चिंतनाला कृतीची जोड देणारे तत्त्वज्ञ

    दिनांक :03-Feb-2026
Total Views |
 
वेध
prof vishwanath karad अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालून या आधुनिक युगात मानव कल्याणासाठी झटणारे तत्त्वज्ञ आणि भारतीय संस्कृतीला आपल्या ध्येयाची जोड देऊन सदैव मार्गक्रमण करणारे प्रा. विश्वनाथ दा. कराड यांचा आज जन्मदिवस. प्रा. विश्वनाथ कराड आज वयाची 85 वर्षे पूर्ण झाल्यावर ध्येय प्राप्तीसाठी त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा जन्म गाव खेड्यामधला. मराठवाड्यामधील रामेश्वर रुई हे त्यांचे जन्मगाव. प्राथमिक शिक्षण गावामध्येच झालेले. त्यानंतर माढा आणि सोलापूर अशी त्यांची शिक्षण यात्रा. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधून ते इंजिनीयर झाले आणि तिथेच प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांच्या कुटुंबावर वारकरी संप्रदायाचा पगडा. या संस्कारांमध्येच ते लहानाचे मोठे झाले. अध्यात्माची ओढ त्यामुळेच त्यांच्या हृदयात कायमची कोरली गेली. अध्यात्माची ही ओढ आणि अथक परिश्रम यामुळे प्रा. कराड यशाचे खरे मानकरी ठरले. संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि प्रेरणा यामधून त्यांना बळ प्राप्त झाले. या महापुरुषांच्या मानवी कल्याणाची शिकवण त्यांनी आपल्या आयुष्यात कायमची रुजविली आणि एमआयटी म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलाजी या संस्थेत मुल्याधिष्ठित वैश्विक शिक्षणाची संकल्पना रुजविली गेली. उच्च तांत्रिक शिक्षण विना-अनुदानित करून विद्यार्थ्यांना अधिक सोयी आणि संधी उपलब्ध करून द्याव्या, गोरगरिब आणि गावखेड्यामधील विद्यार्थ्यांनी पुढे यावे, या उद्देशाने त्यांनी 1981 मध्ये म्हणजे 40 वर्षांपूर्वी एमआयटी या इंजिनीअरीग कॉलेजची स्थापना केली. त्यानंतर या संस्थेचा विस्तार होत आज ही संस्था देशातच नव्हे, तर विदेशातही कीर्तीमान स्थापन करीत आहे.
 
 
 
chintnala krutichi jod
 
आपल्या उभ्या आयुष्यात प्रा. विश्वनाथ कराड यांनी अध्यात्म, समाजप्रबोधन, शिक्षण आणि अन्य क्षेत्रांमध्ये समाजभिमुख अनेक उपक्रम निष्ठेने साकारले. त्यांच्या हातून घडलेले अनेक अलौकीक कार्य तसेच स्वामी विवेकानंद यांनी प्रतिपादीत केलेल्या ‘विज्ञान व अध्यात्म्याच्या माध्यमातून जगात शांती नांदेल’ या वचनावर आधारीत अनेक भव्य वास्तूंनी मूर्तरूप घेतले. आपल्या 40 वर्षांच्या अथक परिश्रमाच्या कालावधीत प्रा. कराड अनेक महनियांच्या संपर्कात आले. त्यात माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान चंद्रशेखर, व्यंकय्या नायडू, डॉ. रघुनाथ माशेलकर आदी अनेकांचा समावेश आहे. प्रा. कराड यांची शिक्षण पद्धतीला नवे वळन देण्याची धडपड, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, देशाभिमान, आपले संस्कार आणि संस्कृती, भारतीय तत्त्वज्ञानाबाबत जागृती निर्माण करणे आदी कार्यांची दखल घेत अनेक महनीय व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे. प्रा. कराड यांनी अध्यात्म, विज्ञान, शिक्षण आणि विश्व शांतीच्या प्रतिक अशा अलौकीक वास्तूंची निर्मितीही केली आहे. त्यात श्रीक्षेत्र आळंदी येथे विश्वरूप दर्शन मंच, वारकरी समाजाचे भक्ती, प्रेम व करुणाचे प्रतिक असलेला 145 फूट उंचीचा सुवर्णजडीत गरुडस्तंभ, रामेश्वर रुई येथील श्री राम रहिम मानवता सेतू, भगवान गौतम बुद्ध विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वशांती भवन, लोणी काळभोर येथे प्रेम आणि मानवतेचा संदेश देणारे श्रीमद् भागवत गीता ज्ञान भवन, 9 घुमट असलेली विश्वशांती संगीत कला अकादमी, विश्वरूप देवता दर्शन मंदिर, संत श्री ज्ञानेवर माउली आणि संत श्री तुकाराम महाराज विश्वशांती प्रार्थना सभागृह व ग्रंथालयाची निर्मिती करून त्यांनी शिक्षणाप्रती तसेच विश्वशांतीसाठी केलेले प्रयत्न अजोड आहेत.prof vishwanath karad एवढे अथक परिश्रम आणि निष्ठेने त्यांनी केलेले हे कार्य ईश्वराला अर्पण करून त्यांनी दाखविलेला मोठेपणा हे भारतीय सनातन संस्कृतीला साजेशे कार्य आहे. जगात स्थर्य आणि शांतता नांदावी आणि ‘हे विश्वची माझे घर’ या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्यास तोड नाही. भारतीय सनातन संस्कृतीची ही शिकवण प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी रुजावी, सर्वश्रेष्ठ विद्यार्थी देशातच तयार व्हावे, यासाठी त्यांची निष्ठा आणि तळमळ, नवीन भारताच्या उभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान शाश्वत परंपरेला साजेसे आहे. आपली परंपरा आणि संस्कृतीवर असलेल्या दृढ विश्वासाने, अनेक विपरीत परिस्थितीवर मात करून त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले आहे. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा देत आपण सर्व देशाच्या आणि विश्वाच्या कल्यासाठी दृढ सकल्प करू या!

चंद्रकांत लोहाणा
9881717856