अनैतिक संबंधांचा संशय; आई-मुलासह तिघांनी कट रचून तरुणाची निर्घृण हत्या

03 Feb 2026 21:50:35
पुणे,
murder-case : पिंपरी-चिंचवड परिसरातील चाकणमध्ये अनैतिक संबंधांमधून निर्माण झालेल्या संशयाने एका तरुणाचा अमानुष खून झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बिरदवडी गावच्या स्मशानभूमीमागील ओढ्याजवळ सापडलेल्या अनोळखी मृतदेहामागील रहस्य तब्बल २० दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी उकलले आहे.
 
 
 
CHAKAN
 
 
खून झालेल्या तरुणाचे नाव मुंजा धोंडीबा नरहिरे (वय २५, रा. गंगाखेड, जि. परभणी) असे असून या प्रकरणात निखील नानासाहेब चव्हाण, त्याची आई उषा नानासाहेब चव्हाण आणि त्यांचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त मारुती जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी रोजी निर्जन ठिकाणी हा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता, तर ओळख पटू नये म्हणून चेहरा दगडाने चिरडण्यात आला होता. मृताच्या खिशातील मोबाईल आणि ओळखपत्रही गायब होते.
 
घटनास्थळी दारू, पाण्याच्या बाटल्या आणि सिगारेट सापडल्याने पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, दुकानदारांची माहिती, तांत्रिक तपास आणि सोशल मीडियाच्या मदतीने संशयितांचा माग काढण्यात आला. अखेर तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
 
तपासात समोर आले की, मुंजा नरहिरे याचे निखील चव्हाणच्या जवळच्या नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध होते. या संबंधांमुळे महिलेला सतत त्रास होत असल्याचा संशय निखील आणि त्याच्या कुटुंबाला होता. याच रागातून निखील, त्याची आई उषा आणि मित्र स्वप्नील यांनी संगनमत करून खुनाचा कट रचला. ७ जानेवारी रोजी मुंजाला मूळ गावातून चाकण येथे बोलावून घेण्यात आले. दारू पिण्याच्या बहाण्याने त्याला निर्जन ठिकाणी नेऊन कोयत्याने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आणि नंतर ओळख नष्ट करण्यासाठी चेहरा दगडाने विद्रूप करण्यात आला.
 
चाकण उत्तर पोलिस ठाण्याच्या पथकाने सलग २० दिवस मेहनत घेऊन सीसीटीव्ही फुटेज, भौतिक पुरावे आणि गुप्त माहितीद्वारे हा गुन्हा उघडकीस आणला. सहायक पोलिस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम व त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
Powered By Sangraha 9.0