पुण्याच्या ५८व्या व १०व्या महिला महापौर मंजुषा नागपुरे

उपमहापौर परशुराम वाडेकर निश्चित

    दिनांक :03-Feb-2026
Total Views |
पुणे,
Pune Mayor : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने या दोघांचाही विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीची आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
 
 
 
Pune Mayor
 
 
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ११९ जागा मिळाल्याने पक्षाची एकहाती सत्ता आहे. यावेळी महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने मंजुषा नागपुरे, वर्षा तापकीर, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे आणि स्वरादा बापट यांची नावे चर्चेत होती. अखेर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दोघांनीही नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बिडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
 
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत होणार आहे. भाजपकडे बहुमत असल्याने नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या निवडीनंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, यंदा त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळवला आहे. महापालिकेच्या कामाचा त्यांना चांगला अनुभव असून त्यांनी स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे.
 
उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांची निवडही निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे मागील टर्ममध्ये त्यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या आणि आता पत्नीपाठोपाठ पती उपमहापौर होणार आहेत.
 
दरम्यान, भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका वर्षा तापकीर यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याची चर्चा आहे. त्या सलग चौथ्यांदा निवडून आल्या असल्या तरी त्यांना महत्त्वाचे पद मिळाले नाही.
 
मंजुषा नागपुरे यांची निवड झाल्यानंतर त्या पुणे महापालिकेच्या ५८व्या महापौर आणि दहाव्या महिला महापौर ठरणार आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना नागपुरे म्हणाल्या की, महापौरपद हे केवळ उपभोगासाठी नसून पुणेकरांची सेवा करण्याची मोठी संधी आहे आणि पुणेकरांना अभिमान वाटेल असे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील.