पुणे,
Ajit Pawar's last words राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनापूर्वीच्या शेवटच्या फोन संभाषणाचा ऑडिओ सार्वजनिक केल्याने राज्याच्या राजकारणात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्या दुर्दैवी घटनेपूर्वी मुंबईहून बारामतीकडे रवाना होण्याआधी त्यांनी पक्षातील कार्यकर्ते श्रीजित पवार यांच्याशी केलेल्या संवादाचा हा ऑडिओ असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या शेवटच्या संभाषणात अजित पवार यांनी राजकारणात सर्वसमावेशकतेचा संदेश दिल्याचे स्पष्टपणे ऐकू येते. सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका त्यांनी ठामपणे मांडली होती.
या कॉलविषयी माहिती देताना श्रीजित पवार यांनी सांगितले की, त्यांनी अजित पवार यांना एका विषयासंदर्भात आधी संदेश पाठवला होता. नेटवर्क उपलब्ध होताच अजित पवार यांनी स्वतःहून फोन करून संवाद साधला. श्रीजित पवार यांच्या म्हणण्यानुसार, “आम्ही दोघेही एकाच गावचे आहोत. मी त्यांना एक संदेश पाठवला होता. सिग्नल मिळताच त्यांनी मला फोन केला आणि बोलताना ते म्हणाले की आपण सर्व जाती आणि धर्मांना सोबत घेऊन चालत आहोत.” या संभाषणात अजित पवार यांनी स्थानिक पातळीवरील सामाजिक प्रतिनिधित्वाचाही उल्लेख केला. सुपे परिसरातील माळी समाजाला जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व देण्यात आल्याचे सांगत, आपण सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसने हा ऑडिओ सार्वजनिक करण्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. पक्षाच्या मते, अजित पवार यांचे शेवटच्या क्षणांपर्यंतचे विचार आणि त्यांची राजकीय भूमिका जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. श्रीजित पवार यांनी सांगितले की, हा ऑडिओ प्रसिद्ध करण्यामागचा उद्देश महाराष्ट्राला हे सांगणे आहे की अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत समतेचा, एकतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विचार करत होते. या ऑडिओ क्लिपमधून अजित पवार यांची सामाजिक समरसतेची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या विचारांची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.
असे आहे संभाषण
- अजित पवार- आम्ही पण सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जातो.
- श्रीजीत पवार- मला जे वाटलं ते मत मी मांडलं दादा.
- अजित पवार- अहो, बरोबर आहे. पण मी माळी समाजाला जिल्हा परिषदेची उमेदवारी सुपे गटातून दिली आहे. ती जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखी होती. असं असतानाही इतर पक्षांनी वेगळे उमेदवार दिले. मात्र त्या पद्धतीने आपण केलं आहे.
- श्रीजीत पवार- ठीक आहे दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो, तो निर्णय घ्या.
- अजित पवार- ओके.