‘अरुणोदय’ सिकलसेल अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

1 लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी

    दिनांक :04-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
arunoday-sickle-cell-campaign : सिकलसेलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उद्देशाने यवतमाळ जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे निर्मूलन व जनुकीय दोष रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियाना’ला यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनात व्यापक जनजागृतीमुळे या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, आतापर्यंत 1 लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
 
 
 
ytl
 
 
 
या अभियानाची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गावोगावी दवंडीद्वारे माहिती, शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने आणि प्रभातफेरी, घरोघरी जाऊन आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवकांमार्फत समुपदेशन, सोशल मिडिया भित्तीपत्रके आणि माहितीपत्रिकांचा वापर, यामुळे नागरिकांमधील भीती दूर होऊन तपासणीकडे लोकांचा कल वाढला आहे.
 
 
आकाशवाणीद्वारे मुलाखत व जिंगलद्वारे प्रसिद्धी या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील 0 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. जिल्ह्यातील 0 ते 40 वयोगटातील एकूण 2,11,337 नागरिकांची तपासणी करण्याचे लक्ष्य असून आतापर्यंत 1,03,790 नागरिकांची सिकलसेल तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीदरम्यान 28 नवीन सिकलसेल कॅरिअर (वाहक) रुग्ण आढळून आले आहेत. सिकलसेल आजार अनुवांशिक असल्याने तो पुढच्या पिढीत संक्रमित होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष पाऊल उचलले आहे.
 
 
शोधण्यात आलेल्या नवीन 28 रुग्णांसाठी 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान विशेष विवाहपूर्व समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यातून रुग्णांना भविष्यातील धोके आणि घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. सिकलसेल मुक्त जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घेणे आवश्यक आहे. राहिलेल्या नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी केले आहे.