फूड डिलिव्हरी बॉईजकडून व्यावसायिकाची मारहाण

    दिनांक :04-Feb-2026
Total Views |
नवी दिल्ली,
food delivery boys दिल्लीच्या मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या कनॉट प्लेस परिसरातून एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून सुरू झालेला प्रकार थेट एका ३६ वर्षीय व्यावसायिकाच्या मृत्यूपर्यंत पोहोचला असून, या घटनेमुळे राजधानीतील सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत व्यावसायिकाचे नाव शिवम गुप्ता असे असून, ३ जानेवारी रोजी कनॉट प्लेसमधील राजीव चौक परिसरात ही घटना घडली. माहितीनुसार, शिवम गुप्ता एका मित्रासोबत पार्टीसाठी कनॉट प्लेसमध्ये गेले होते. कार्यक्रमानंतर ते बाहेर पडत असताना राजीव चौक मेट्रो स्थानकाजवळ एका फूड डिलिव्हरी कंपनीच्या प्रतिनिधीकडे त्यांनी पाणी मागितले. याच क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि तो काही क्षणांतच हिंसक रूप धारण करू लागला.
 
 
dilhi
वाद वाढताच फूड डिलिव्हरी बॉईने शिवम गुप्ता यांच्या डोक्यावर हेल्मेटने वार केल्याचे सांगितले जाते. एवढ्यावरच न थांबता, त्याच्यासोबत असलेल्या आणखी दोन सहकाऱ्यांनी शिवम यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत शिवम गुप्ता रस्त्यावर कोसळले. घटनेनंतर त्यांना तातडीने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी आरएमएल रुग्णालयात हलवण्यात आले. तब्बल १७ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर १९ जानेवारी रोजी उपचारादरम्यान शिवम गुप्ता यांचा मृत्यू झाला.
 
 
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुरुवातीला आयपीसीच्या कलम ११० अंतर्गत, म्हणजेच हत्या न करता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, सामूहिक हेतू सिद्ध होऊ शकतो म्हणून कलम ३४ देखील लावण्यात आले आहे. तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी आणखी गंभीर कलमे जोडली जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोघांना अटक केली असून, घटनेत सहभागी असलेल्या इतर व्यक्तींची भूमिका काय होती, याचा सखोल तपास सुरू आहे. राजधानीच्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.