राष्ट्र प्रथम ही भावना काळाची गरज : जगदीश प्रसाद

बालाजी वस्तीत विशाल हिंदू संमेलन

    दिनांक :04-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
jagdish-prasad : ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना नव्या पिढीत रुजवणे ही काळाची गरज आहे याच उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त समाजात पंच परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. स्वबोध, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य आणि पर्यावरण संरक्षण या माध्यमांतून सामाजिक परिवर्तन घडवून आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय शारीरिक प्रमुख जगदीश प्रसाद यांनी केले.
 

y4Feb-Hindu 
 
ते यवतमाळ येथील बालाजी भागाद्वारे आयोजित हिंदू संमेलनात बोलत होते. यावेळी मंचावर श्रीमद्जगत्गुरू रामानंदाचार्य स्वामी, श्रीराजेश्वर माऊली सरकार, कार्यक्रमाचे संयोजक देविदास गोपलानी व सहसंयोजक विनोद देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. समाजामध्ये याबाबत व्यापक जनजागृती निर्माण होणे गरजेचे असून, विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी या विचारांचे महत्त्व प्रसाद यांनी प्रभावीपणे पटवून दिले.
 
 
भारतावर इतिहासात अनेक आक्रमणे झाली; अनेक आक्रमक आले, परंतु भारतीय समाज कधीही घाबरला नाही. मात्र आज समाजाने घाबरण्याची खरी गरज आहे ती बिघडत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेची आणि संपुष्टात येत असलेल्या नातेसंबंधांची. लहान व विभक्त कुटुंब पद्धती वाढत असल्यामुळे काका, आत्या, मामा, मावशी, भाऊ, बहीण अशी अनेक नाती लुप्त होत चालली आहेत, याकडे रामानंदाचार्य स्वामी यांनी लक्ष वेधले.
 
 
यामुळे हिंदू संस्कृतीतील संस्कार, सभ्यता व मूल्यव्यवस्थेलाही धोका निर्माण होत आहे. ही स्थिती लक्षात घेता, पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून आपली संस्कृती, संस्कार व सभ्यता जपण्यासाठी सकल हिंदू समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपले आशीर्वर्चनपर विचार व्यक्त करताना केले.
 
 
हिंदू संमेलनप्रसंगी यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, शिवकालीन मर्दानी खेळाचे राष्ट्रीय पंच प्रीतम सोनवणे, तसेच गणतंत्रदिनी महाराष्ट्राच्या चित्ररथ निर्मितीत सहभागी असलेले देवांशू आहुजा आणि स्वागत समितीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
यावेळी श्रीराम संगीत विद्यालयाच्या मेघा डाऊ व विद्यार्थ्यांनी भक्तीगीते सादर केली. शिवकालीन मर्दानी खेळांतर्गत प्रीतम सोनवणे व त्यांच्या समूहाने सादर केलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास गोपलानी यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. प्राजक्ता टिकले यांनी, तर आभारप्रदर्शन अमित पांडे यांनी केले. कार्यक्रमाला बालाजी भागातील जनता, मातृशक्ती, नवयुवक, स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतमातेच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
 
कार्यक्रमासाठी प्रवीण बंडेवार, विनीत देशपांडे, महेश जोशी, राजेश मुक्कावार, रूपेश मुळे, गजानन देशमुख, अनंत देशपांडे, अ‍ॅड. जीवन लढी, संकर्षण मोहरील, दिलीप राखे, डॉ. प्रसाद बनसोड, डॉ. प्रदीप गिरी, सुबोध राखे, रमेश आहुजा, योगेश गाबडा, मंगला देशपांडे, मनीषा आकरे, हेमंत कोषटवार, डॉ. छत्तानी, श्रेयस भावे, कामेश राखे व परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.