स्पेनचा मोठा निर्णय; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी!

04 Feb 2026 11:33:35
माद्रिद.
Spain's big decision स्पेन सरकारने सोशल मीडियाच्या वापराबाबत एक ऐतिहासिक आणि कठोर निर्णय जाहीर केला आहे. देशात १६ वर्षांखालील मुलांना फेसबुक, व्हॉट्सअॅपसह कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येणार नाही. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी दुबई येथे सुरू असलेल्या जागतिक शिखर परिषदेत ही घोषणा करत, मुलांच्या सुरक्षिततेसाठी सरकार कठोर पावले उचलत असल्याचे स्पष्ट केले. पेड्रो सांचेझ यांनी सांगितले की लहान वयातील मुलांवर सोशल मीडियाचा गंभीर परिणाम होत असून, अश्लील, प्रक्षोभक आणि दिशाभूल करणारी ऑनलाइन सामग्री त्यांच्या मानसिक आणि सामाजिक विकासाला धोका पोहोचवत आहे. यामुळेच सरकार लवकरच अधिकृत अधिसूचना काढून १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर संपूर्ण बंदी लागू करणार आहे. या निर्णयानंतर कोणताही अल्पवयीन वापरकर्ता सोशल नेटवर्किंग साइट्सवर खाते उघडू शकणार नाही.
 
 
 
 social media
पंतप्रधानांनी मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवरही जोरदार टीका केली. बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्री, अश्लील फोटो-व्हिडिओ आणि डीपफेकसारख्या धोकादायक गोष्टींवर कंपन्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कंपन्यांना नफा महत्त्वाचा असू शकतो, पण सरकारला मुलांचे भविष्य आणि समाजाचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याचे सांचेझ यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या मते, सोशल मीडियामुळे आजची मुले एकाकी होत चालली आहेत. प्रत्यक्ष सामाजिक संवाद कमी होत असून नैतिक, सामाजिक आणि वर्तनाशी संबंधित मूल्यांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे. हा प्रवास देशाच्या प्रगतीकडे नव्हे, तर अधोगतीकडे नेणारा असल्याचा इशाराही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, या निर्णयाला सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी पाठिंबा मिळत असल्याने देशभरात या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याची शक्यता आहे.
 
स्पेन हा असा निर्णय घेणारा पहिला देश नाही. याआधी ऑस्ट्रेलियाने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालून जगाचे लक्ष वेधले होते. डेन्मार्कने १५ वर्षांखालील मुलांसाठी अशीच मर्यादा लागू केली आहे. फ्रान्समध्ये जानेवारी २०२६ पासून १५ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडिया बंदीचा कायदा शाळांमध्ये लागू करण्यात आला आहे. दरम्यान, ब्रिटन आणि भारतातही अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर निर्बंध घालावेत, अशी मागणी वाढत आहे. मात्र या दोन्ही देशांमध्ये अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. स्पेनच्या या निर्णयामुळे जागतिक पातळीवर सोशल मीडियाच्या नियमनाबाबत नव्या चर्चेला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Powered By Sangraha 9.0