संस्कृती, परंपरा सांभाळणे ही आपली जबाबदारी

04 Feb 2026 21:51:50
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
swanand-pund : आपली भारतीय संस्कृती, परंपरा सांभाळणे आणि ती पुढच्या पिढीला हस्तांतरित करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या परंपरेनुसार आलेली कौटुंबिक रचना ही भविष्यातसुद्धा कायम राहिली पाहिजे, कुटुंब व्यवस्था, हिंदू संस्कृती परंपरा ही कायम राहिली पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी केले.
 
 
y4Feb-Sanskruti
 
यवतमाळ येथील शिवाजीनगर वस्तीद्वारे आयोजित विशाल हिंदू संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी वर्धा येथील अटलबिहारी पांडेय, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश जिरापुरे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना कुटुंब प्रबोधन, ‘स्व’चा बोध या पंचपरिवर्तन आधारित विषयावर डॉ. पुंड यांनी मार्गदर्शन केले.
 
 
रामायनात हनुमंतांना एवढ्या मोठ्या लंकेमध्ये केवळ एकच घर असे सापडले ज्या ठिकाणी रामचंद्रांची पूजा, तुळशी वृंदावन ही सर्व प्रतीके त्यांना दिसली आणि मग त्यांना लक्षात आले की एवढ्या मोठ्या परराज्यामध्ये ज्या ठिकाणी सर्व राक्षसांचा आणि शत्रूंचा स्वैराचार आहे यामध्येसुद्धा संस्कृती ही बिभीषणाच्या माध्यमातून टिकवली गेलेली आहे, असा दाखला त्यांनी दिला.
 
 
आपण भारतात राहतो. भारतीय संस्कृती परंपरा ही आपली आहे तिचे जतन आपण केले पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरात रोज पूजाअर्चा, उपासना, सामूहिक रामरक्षा किमान झाली पाहिजे, असा संकल्प डॉ. स्वानंद पुंड यांनी त्यांनी सर्वांकडून करून घेतला.
कार्यक्रमाचे दुसरे वक्ता स्वावलंबी भारत योजनेचे विदर्भ प्रांतप्रमुख अटलबिहारी पांडेय यांनी लव जिहाद, लँड जिहाद, गोहत्या या विषयांवर आधारित मार्गदर्शन उपस्थित नागरिकांना केले.
 
 
विशाल हिंदू संमेलनाच्या सुरुवातीला शिवाजीनगर वस्तीतून पारंपारिक दिंडी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शेकडोंच्या उपस्थितीत नागरिक उपस्थित होते. प्रारंभी भारत मातापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष सतीश मानलवार, आभारप्रदर्शन प्रदीप उमरे यांनी, तर संचालन प्रा. प्रेमेंद्र रामपूरकर यांनी केले. भारतमातेच्या सामूहिक आरतीने कार्यक्रमाचा समारोप झाला.
 
 
कार्यक्रमाला प्रामुख्याने स्थानिक नगरसेवक चंद्रशेखर चौधरी, पंकज देशमुख, रीता धावतोडे, उपगनलावार यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक नंदा जिरापुरे, प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे, प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा, अनिल कवीमंडन, श्रीकांत देशपांडे, दिनेश गंधे, डॉ. चेतन राठोड यांच्यासह वस्तीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0