vishnu purana विष्णुपुराण हे अठरा पुराणातील अत्यंत गोड पुराण असून ऋषी पाराशर आणि महामुनी जैमिनी यांच्यातील हा संवाद आहे. या पुराणात भारताचा इतिहास, भूगोल, भारतीय नैतिक, आध्यात्मिक शिक्षण, ज्योतिष आणि विविध कला याचे दर्शन आहे. एकूण सहा अंश म्हणजे सहा भागांत विभाजित केलेले हे पुराण भगवान विष्णूंचे गुणगान करणारा विद्वत्प्रचुर ग्रंथ आहे.
ग्रंथाच्या प्रारंभीच मुनीश्रेष्ठ पाराशर ऋषींना त्यांचे परम् शिष्य महामुनी मैत्रेय साष्टांग दंडवत करून आपल्या काही शंका आणि प्रश्न विचारले.
पाराशरं मुनीवरं कृतपौर्वान्हिकक्रियम् ।
मैत्रेय: परिप्रपच्छ प्रणिपत्याभिवाद्य च ।
विशेष म्हणजे मैत्रेय ऋषींनी विचारलेले ज्ञान पाराशर ऋषींना आपले आजोबा वशिष्ठ महर्षी आणि महर्षी पुलस्त्य यांच्याकडून मिळाले असल्याने त्यांचे स्मरण पाराशर महामुनींना झाले.
इति पुर्वं वसिष्ठेन पुलस्त्येन च धीमता ।
यद्युक्तं तत्स्मृतिं याति त्वत्प्रश्नादखिलं मम ।।
त्या आनंदाने त्यांनी हे विष्णुपुराण मैत्रेय यांना सांगितले.
पहिल्या अंशात त्यांनी सृष्टीची उत्पत्ती, ब्रह्मांडाची रचना आणि त्या अनुषंगाने काही पौराणिक कथा सांगितल्या. दुसèया अंशात पृथ्वीचे वर्णन, सप्तद्वीप, भारतवर्षाचे वर्णन, भूगोल आणि खगोल सांगितला. तिसèया अंशात कालगणना, मन्वंतरादी आणि वेद धर्माचे वर्णन दिले आहे .चौथ्या अंशात सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजांची माहिती तर पाचव्यात भगवान श्रीकृष्णाचे व्यापक चरित्र दिले आहे. अखेर सहाव्या अंशात कलियुगाचे वर्णन, प्रलय वर्णन, त्रिविध ताप, ब्रह्मयोग इत्यादीचे वर्णन केले आहे.
विष्णुपुराणात प्रथम अंशात एकोणविसाव्या अध्यायात भक्त प्रल्हाद आणि त्यांचे पिता दैत्यराज हिरण्यकश्यपू यांचा संवाद चिंतनीय आहे.
दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या आश्रमातून शिकून परत आल्यावर आपला पुत्र काय शिकला हे पाहण्यासाठी हिरण्यकश्यपूने पुत्र प्रल्हाद याला काही प्रश्न विचारले. त्यात राजाने आपल्या मित्रांशी, शत्रूंशी कसे वर्तन करावे? मंत्री, अमात्य, गुप्तचर इत्यादींप्रति कसा व्यवहार हवा? असे अनेक राजनैतिक प्रश्न त्याला विचारले.
त्यावर प्रल्हादाचे उत्तर खूपच महत्त्वाचे आहे.
प्रल्हाद म्हणतात की, कृपया क्रोध करू नका, पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जर दैत्यगुरू शुक्राचार्यांच्या नीतीने दिली तर ती नीती मला अजिबात मान्य नाही.
जर
सर्व भूतात्मके तात जगन्नाथ जगन्मये ।
परमात्मनि गोविंदे मित्रामित्रकथा कुत: ।।
हे तात! तो जगन्नाथ सर्वव्यापी आहे तर शत्रू-मित्र आलेच कुठून? हे सर्व अविद्येच्या प्रभावाने होत आहे. या संवादातच सुप्रसिद्ध असा विद्येचा व्याख्या करणारा श्लोक आहे.
तत्कर्म यन्न बन्धाय सा विद्या या विमुक्तये ।
आयासायापरं कर्म विद्यान्या शिल्पनैपुणम् ।।
कर्म तेच जे माणसाला बंधमुक्त करते. विद्या तीच जी माणसाला जीवनमुक्त करते. बंधमुक्त न करणारे कर्म म्हणजे केवळ क्रियाकलाप होईल. विद्या जर जीवनमुक्त करीत नसेल तर ते केवळ नैपुण्य किंवा कौशल्य आहे. अनेक शिक्षण संस्थांचे ब्रीदवाक्य ‘‘सा विद्या या विमुक्तये’’ असते. ते याच पुराणातील आहे. भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्यातील हा संवाद खूपच सुंदर आहे. खरे तर दैवी विचार आणि दैत्य विचार यातील हा तात्त्विक वाद तेव्हाही होता जो आजपर्यंत सुरू आहे. पण विजय दैवी विचारांचाच तेव्हाही आणि आताही होणार हा दृढविश्वास हे पुराण देते.
याच पुराणातील तिसऱ्या अंशातील तिसऱ्या अध्यायात भारतवर्षाचे सुंदर वर्णन असून जगाला आम्ही किती प्राचीन आणि सभ्य आहोत हे पटवून देण्यासाठी विष्णुपुराण साहाय्यभूत आहे. भारताचे वर्णन करताना सुप्रसिद्ध श्लोक आहे.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।
समुद्राच्या उत्तर दिशेला आणि हिमालयाच्या दक्षिण दिशेला पसरलेला सुंदर देश म्हणजे भारत असून त्यात राहणारे सर्व भारतीय हे भारतमातेची संतती आहे.
नवयोजनसाहस्रो विस्तारोस्य महामुने ।
भारताचा विस्तार नऊ हजार योजन असल्याचे या पुराणात स्पष्ट आहे.
भारतस्यास्य वर्षस्य नवभेदान्निशामय !
भारताचे नऊ भाग नावासह दिले आहेत ज्यात इंद्रद्वीप, कसेरू, ताम्रपर्ण इत्यादी नऊ नावे आहेत.
अत्रापि भारतं श्रेष्ठंं जंबूद्वीपे महामुने !
जंबुद्वीपात भारत सर्वश्रेष्ठ असल्याचा उल्लेख आहे.
धन्यास्तु ते भारत भूमिभागे !
जे भारतात जन्मले ते धन्य आणि भाग्यवान आहेत. ‘‘भारतं प्रथमं वर्षं’’ मेरुपर्वतापासून भारत प्रथम स्थानावर असल्याचे हेच पुराण स्पष्ट करते.
नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च ।
जगत् हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः।।
हा प्रसिद्ध विष्णुमंत्र याच पुराणातील आहे.
‘‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’’ हा सिद्ध द्वादशाक्षरी मंत्र विष्णुपुराणाची देण आहे.
या पुराणात कृषिशास्त्र, वाणिज्य आणि गोपालन यावर चर्चा आहे. वास्तुरचनेत आजकाल काळाची गरज म्हणून शौचालय घरात असते. विष्णुपुराणानुसार शौचालय गावाच्या वेशीवरून जर बाण मारला तर तो ज्या अंतरावर जातो, गावकèयांनी तितक्या लांब गावापासून दूर शौचासाठी जावे. गृहस्थीचे नियम सांगताना अतिथी, गाय, वयोवृद्ध यांची सेवा, उधारी परतफेड, नीती नियम इत्यादींबाबत विष्णुपुराण मार्गदर्शन करते. एकादशीचे महत्त्व इथे आहे. समाजस्वास्थ्यासाठी विवाहाचे ब्राह्म, दैव, आर्ष, प्रजापत्य, आसुर, गांधर्व, राक्षस आणि पिशाच्च असे विविध आठ प्रकार या पुराणात आहेत. थोडक्यात, विष्णुपुराण विष्णुभक्ती, भक्ती आणि ज्ञान यांचा संगम आहे. अभ्यासकांनी विशेष अभ्यास करून भारतीय भूगोल, भारतीय संस्कृती, भारतीय विज्ञान आणि भारतीय ज्ञान परंपरा उजेडात आणावी ही माफक अपेक्षा.
प्रा.दिलीप जोशी,वाशिम.
9822262735