सामनाआधी टीमला धक्का...हा खेळाडू बाहेर

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
मुंबई,
A shock to the team before the match मुंबई आणि कर्नाटक यांच्यात होणाऱ्या रणजी करंडक उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख फलंदाज सरफराज खान अचानक आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, कर्नाटकविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात त्याचा सहभाग अनिश्चित झाला आहे. ६ फेब्रुवारीपासून बीकेसी येथील शरद पवार क्रिकेट अकादमीत हा सामना खेळवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरफराज खानला विषाणूजन्य ताप आला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीबाबत सध्या कोणताही अधिकृत वैद्यकीय अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, सामन्यापूर्वीच त्याची तब्येत खालावल्याने मुंबई संघाची चिंता वाढली आहे. सरफराज वेळेत तंदुरुस्त न झाल्यास, मुंबईच्या फलंदाजीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
 

sarfaraz khan
 
विशेष म्हणजे, सरफराज खान सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या महिन्यात त्याने हैदराबादविरुद्ध दमदार द्विशतक झळकावले होते. चालू रणजी करंडक हंगामात तो मुंबईचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरला असून, आतापर्यंत नऊ डावांमध्ये त्याने ४२९ धावा केल्या आहेत. या कामगिरीत एका शतकाचा आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे कर्नाटकसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याची अनुपस्थिती मुंबईसाठी मोठे नुकसान ठरू शकते. दरम्यान, मुंबई संघासाठी काही प्रमाणात दिलासादायक बातमीही आहे. कर्नाटकविरुद्धच्या नॉकआउट सामन्यात अष्टपैलू शार्दुल ठाकूर संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच युवा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालही या सामन्यात खेळताना दिसणार आहे. रणजी ट्रॉफी पुन्हा सुरू झाल्यानंतर गेल्या महिन्यात हे दोन्ही खेळाडू मुंबईकडून मैदानात उतरले नव्हते.
मुंबईने ग्रुप डी मध्ये दमदार कामगिरी करत ३३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. गटसामन्यांत संघ अपराजित राहिला असून, चार सामने जिंकले तर तीन सामने बरोबरीत सुटले. या जोरावर मुंबईने बाद फेरीत प्रवेश केला आहे. या हंगामात मुंबईचा संघ आपले ४३ वे रणजी करंडक विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. मुंबईने शेवटचे विजेतेपद २०२३-२४ हंगामात पटकावले होते. दुसरीकडे, कर्नाटकचा संघही आठ वेळा रणजी करंडक विजेता ठरलेला असून, मुंबईला पराभूत करून पुढील फेरी गाठण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या पार्श्वभूमीवर, आता सर्वांचे लक्ष सरफराज खानच्या फिटनेस अहवालाकडे लागले आहे. मुंबईच्या विजेतेपदाच्या शर्यतीत त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, तो मैदानात उतरणार की नाही, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.