नवी दिल्ली,
Al Falah University president arrested अल फलाह विद्यापीठाचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांना दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विद्यापीठाशी संबंधित फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. युजीसीने दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्यानुसार सिद्दीकी यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे चौकशीसाठी त्यांना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले.
अल फलाह विद्यापीठाचे नाव दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील काही दहशतवाद्यांशी जोडले गेल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विद्यापीठाभोवतीची तपासाची फास आवळली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यापूर्वीच अल फलाह ग्रुपचे अध्यक्ष जवाद अहमद सिद्दीकी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ३१ जानेवारीच्या सुनावणीदरम्यान, सिद्दीकी यांच्या वकिलांनी ईडीकडून सादर करण्यात आलेले सुमारे दहा हजार पानांचे आरोपपत्र अभ्यासण्यासाठी अधिक वेळ मागितला होता. या प्रकरणात ईडीने १६ जानेवारी रोजी हरियाणातील अल फलाह विद्यापीठाची सुमारे १४० कोटी रुपयांची जमीन आणि इमारती जप्त केल्या होत्या. १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर हे विद्यापीठ तपास यंत्रणांच्या रडारवर आले. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंतरिम आदेश काढत फरीदाबादच्या धौज भागातील विद्यापीठाची सुमारे ५४ एकर जमीन, शैक्षणिक इमारती आणि वसतिगृहे ताब्यात घेतली आहेत.
यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली सिद्दीकी यांना ईडीने अटक केली होती. अल फलाह ग्रुपविरोधातील ईडीचा तपास दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केलेल्या दोन एफआयआरवर आधारित आहे. तपासात असा आरोप करण्यात आला आहे की विद्यापीठाने NAAC आणि UGC मान्यतेबाबत खोटे व दिशाभूल करणारे दावे करून विद्यार्थी, पालक आणि इतर संबंधितांची फसवणूक केली. ईडीच्या माहितीनुसार, २०१८ ते २०२५ या कालावधीत विद्यापीठाने सुमारे ४१५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून ही उत्पन्नवाढ घोषित आर्थिक स्थितीशी सुसंगत नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, एका व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्कच्या तपासादरम्यान अल फलाह विद्यापीठाची भूमिका समोर आली. या प्रकरणात विद्यापीठाशी संबंधित दोन डॉक्टर, मुझम्मिल अहमद गनई आणि शाहीन सईद, यांना राष्ट्रीय तपास संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली होती. या सर्व घडामोडींमुळे अल फलाह विद्यापीठ आणि त्याच्या व्यवस्थापनावर कायदेशीर अडचणी वाढताना दिसत आहेत.