राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव
आठ पारितोषिकांचे मानकरी
अमरावती,
Amravati University ranks third परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात अमरावती विद्यापीठाने आठ पारितोषिकासह तिसरे स्थान मिळविले आहे. अजिंक्य पोटे याने शेती व पशू संवर्धन विषयाच्या पी.एचडी. गटातून प्रथम पारितोषिक, रोहिणी कांबे हिने वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा विषयाच्या पदवी गटातून द्वितीय, प्रिया जंजाळकर हिने अभियांत्रिकी व तांत्रिकी विषयाच्या पदव्युत्तर गटातून तृतीय, सौरभ श्रीराव याने मेडिसीन अॅन्ड फार्मसी विषयाच्या पदव्युत्तर गटातून तृतीय, तर राजकुमार जीवतानी याने मानवविज्ञान, भाषा आणि ललित कला विषयाच्या पी.एचडी. गटातून, रोहन बुंदेले याने वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा विषयाच्या पदव्युत्तर गटातून, श्रावणी ठाकरे हिने शुद्ध विज्ञान विषयाच्या पदव्युत्तर गटातून, रेणुका येंडे हिने वैद्यकीय आणि औषध निर्माण विषयाच्या पदव्युत्तर गटातून उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त करून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. स्पर्धेच्या समारोपीय समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी पोस्टर व मॉडेल सादरीकरणाच्या माध्यमातून ९०८ स्पर्धकांमधून व सर्व गटातून एकूण २२९ स्पर्धकांची निवड दुसर्या दिवशी होणार्या सादरीकरणाच्या टप्प्यासाठी करण्यात आली होती. यामध्ये अमरावती विद्यापीठाच्या ४६ पैकी १८ विद्यार्थ्यांचा समावेश होता. या टप्प्यात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करुन परीक्षकांची मने जिंकली. महोत्सवाच्या समारोपीय समारंभामध्ये सर्व विजेत्यांना पारितोषिके व संशोधन फेलोशिप देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, तर प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. अशोक कुुमार सिंग, प्रगतिशील शेतकरी पद्मश्री श्रीरंग लाड होते.
Amravati University ranks third स्पर्धेत अमरावती विद्यापीठाचे सहा गटातून ४६ विद्यार्थी संशोधक सहभागी झाले होते. चमू सोबत आविष्कार समन्वयक डॉ. मनीषा कोडापे, चमू व्यवस्थापक डॉ. राजेश भोयर, डॉ. नीरज घनवटे, डॉ. जयंत वडतकर सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आविष्कार सेलचे सर्व सदस्य, तज्ज्ञ समिती यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.