गटनेता वडेट्टीवारांचा, स्थायी समिती मित्रपक्षाकडे
अखेर दिल्ली दरबारी तोडगा निघाल्याचा दावा
चंद्रपूर,
Chandrapur Municipal Corporation चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. काँग्रेसमधल्या वादावर आता अंतिम तोडगा निघाला असल्याचा दावा या पक्षाने केला असून, अडीच-अडीच वर्षांचे महापौरपद आधी खा. प्रतिभा धानोरकर आणि नंतर आ. विजय वडेट्टीवार यांच्या उमेदवारांना मिळेल. गटनेता मात्र वडेट्टीवार गटाचा राहील. त्यासाठी राजेश अडूर यांच्या नावाची शिफ ारस वडेट्टीवार यांनी केल्याचे कळते.
वडेट्टीवार यांच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात नागपूर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली असून, गट नोंदणीबाबत त्रुटी दाखवत पूर्तता करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशावरच नगरसेवकांनी याचिका दाखल केली आहे. वडेट्टीवार गटाच्या या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये 19 फेब्रुवारीला ही सुनावणी होणार आहे. दरम्यान, दिल्लीतील हायकमांडने चंद्रपुरातील वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या वादावर तोडगा काढला काढल्याचा दावा करीत आहे. त्यानुसार आता धानोरकर व वडेट्टीवार गटाला प्रत्येकी अडीच वर्ष महापौर पद दिले जाणार आहे. पहिले अडिच वर्ष प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौर पद मिळेल. पुढील अडीच वर्ष वडेट्टीवार गटाचा महापौर असेल. तर शिवसेना ठाकरे गटाकडे स्थायी समिती असणार आहे.
भाजपाही सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात
Chandrapur Municipal Corporation चंद्रपूरात 10 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. चंद्रपुरात महापौर आणि उपमहापौर बसविण्याच्या काँग्रेसच्या हालचाली सुरू असतानाच भाजपानेदेखील उमेदवारी दिली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाने संगीता खांडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावार यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून या दोन्ही नावांचे पत्र जारी करण्यात आले आहे. भाजप गटनेते आणि उपमहापौरपदी किशोर जोरगेवार यांचे समर्थक, तर महापौरपदी सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकाला संधी देत सत्ता संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचे बोलल्या जात आहे.
आम्ही नाही, समोरचेच आमच्याशी चर्चा करताहेतः मुनगंटीवार
भाजपाला महापौरपद मिळावे. चंद्रपूर महानगराचा विकास व्हावा यासाठी काँग्रेसचे आमचे मित्रच प्रयत्न करीत आहेत. आमचे गणित सुटत आमचा महापौर बनेल. आमची कोणासोबतही चर्चा झालेली नाही. पण समोरच्यांची आमच्यासोबत चर्चा सुरू आहे. 11 फेब्रुवारीला कुणासोबत चर्चा झाली हे निश्चित सांगू, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.