वेध
सोनाली पवन ठेंगडी
घातपात, अपघात, आत्महत्या याच्या बातम्या फार ठळकपणे द्यायच्या नाहीत, असा दंडक बरीच माध्यमे पाळताना दिसतात. हा नियम प्रत्येक माध्यमाने आपल्या संवेदनशीलतेतून बनवला आहे. कारण अशा बातम्यांनी एक विचित्र नकारात्मकता येते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले. पण, कधी कधी समाजहितासाठी अशा घटनांच्या वृत्ताला प्राधान्यक्रम द्यावा लागतो. तीन सख्ख्या बहिणींनी Online games ऑनलाईन गेमच्या व्यसनापायी आत्महत्या केली. दुसरीकडे, भोपाळमध्ये एका आठवीतील मुलाने याच कारणातून स्वत:ला संपवले. काही वर्षांपूर्वी पब्जी या गेममुळे अनेक किशोरांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. याच्या बातम्या सातत्याने समोर आल्यानंतर सरकारने त्यावर बंदी आणली. आता पुन्हा ऑनलाईन गेमचे जीवघेणे प्रकार समोर येत आहेत. गाझियाबादमध्ये १२ १६ वयोगटातील तीन सख्ख्या बहिणींनी एकापाठोपाठ एक वरच्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना तर फारच धक्कादायक आहे. आता त्यांचे वडील म्हणताहेत की, या मुली पाच वर्षांपासून कोरियन गेम खेळत होत्या. घरातील त्यांचे प्रत्येक काम त्या खेळातील आदेशानुसार चालायचे. त्यांच्यावर या खेळाचा इतका प्रभाव होता की त्यांनी स्वत:देखील कोरियन धारण केली होती.
विरंगुळा म्हणून अधूनमधून खेळले जाणारे हे खेळ आता मुलांच्या जिवाशी खेळत आहेत. या पृष्ठभूमीवर सर्वच संबंधितांनी अंतर्मुख होऊन सारासार विचार केला पाहिजे. अलिकडच्या काळात Online games पॉकेमॉन जगभर गाजला. मात्र, कित्येक खेळगडी अपघातात जायबंदी झाले तेव्हा आभासी जगात भरधाव वेगाने ओढत नेणार्या या खेळातला धोका कळला. या मुद्यावर पालकांनी गांभीर्याने अंतर्मुख व्हायला हवे आणि अशा स्वरूपाच्या घटना टाळायच्या असतील तर पाल्याची केवळ ‘फिजिकल ऑटोप्सी’च नव्हे, तर ‘सायकॉलॉजिकल ऑटोप्सी’देखील करायला हवी, असे वाटते. म्हणजेच मुलांच्या भावविश्वात पालकांनी तसेच शिक्षकांनी संवेदनशीलतेने डोकावले पाहिजे.
नुकतेच दररोज १२ तास कॉम्प्युटर Online games गेम खेळणारा किशोरवयीन मुलगा दिल्लीतील रुग्णालयात दाखल झाला. कारण काय, तर खेळाच्या नादात त्याची सारासार विचार करण्याची शक्तीच खुंटली. झोप, कुटुंबीयांशी संवाद जणू बंदच झाले. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अशा नादावलेल्या मुलांना वेळीच सावरले नाही तर घरोघरी खुनी खेळाचे डाव रंगतील हे सांगायला का हवे? विशेष म्हणजे, या जीवघेण्या खेळांपैकी अनेक खेळ असे आहेत ज्यांत अट असते की, पालकांशी नका. यावरून आपण पालकांच्या मुलांशी असलेल्या संवादाचे महत्त्व ओळखले पाहिजे. आपली मुले अर्धवट समजाच्या स्थितीत असताना त्यांची मानसिकता गोंधळलेली असते. अशा वेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची कसरत पालकांनीच केली पाहिजे. त्यात जर पालक यशस्वी झाले तर मुलांसोबतचा त्यांचा संवादसेतू नेहमीसाठी सांधला जातो.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला दिलेल्या कुटुंब प्रबोधन हा मुद्दा प्रकर्षाने मांडण्याची गरज आता निर्माण झाली आहे. कारण माणसाची पहिली जडणघडण ही कुटुंबातच होते. आपण पाश्चिमात्यांप्रमाणे कुटुंबापासून विलग होत नाही. तेथे मुलांना फार लवकर कुटुंबापासून वेगळे काढून स्वावलंबनाच्या नावाखाली जगाशी लढण्यासाठी मोकळे सोडले जाते. तो टक्केटोणपे खात जगत असतो. कुटुंबाला त्याच्या या संघर्षाशी जणू काहीच नसते. आपल्या भारतीय समाज व्यवस्थेत सुदैवाने अशी वेळ अजून आलेली नाही. आपल्याकडे आजही कुटुंबाला फार महत्त्व आहे. किंबहुना कुटुंबव्यवस्था हे आपल्या समाजाची घडी नीट ठेवण्याचे मुख्य कारण आहे. सुख-दु:खाच्या काळात सोबत उभे राहणारे कुटुंब मोठा आधार ठरते. त्यामुळे आपली कुटुंबव्यवस्था सांभाळण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांशी संवाद प्रस्थापित करणे आणि त्याद्वारे जीवन योग्य पद्धतीने जगण्यासाठी प्रोत्साहित करताना ‘आम्ही आहोत’ हा विश्वास निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. असे झाले तर जगातील कोणताही खेळ आपल्या नव्या पिढीच्या भावनांशी आणि जीवाशी खेळण्याची हिंमतही करणार नाही. या आणि पुढील प्रत्येक पिढीच्या पाठीशी भक्कम पाठिंबा म्हणून कुटुंब उभे राहील. ही आता काळाची गरज आहे.