'अमर विश्वास’ वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित

राजीव खंडेलवालचा अभिनय प्रवास

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Rajeev Khandelwal गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राजीव खंडेलवाल सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या वकिलीशी संबंधित पोस्टमुळे त्याने अभिनय सोडून प्रत्यक्षात वकिली सुरू केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, या पोस्ट्स त्याच्या आगामी वेब सिरीज ‘अमर विश्वास’शी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सिरीजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
 

Rajeev Khandelwal, Amar Vishwas web series, 
‘अमर विश्वास’ ही सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित वेब सिरीज आहे. कथानक एका खुनाच्या गूढतेभोवती फिरते. सुरुवातीला हा खून “ओपन अँड शट” केस म्हणून घोषित केला जातो, मात्र तपास पुढे सरकत असताना अनेक धक्कादायक रहस्ये उलगडत जातात. ट्रेलरची सुरुवात प्रसिद्ध चित्रपट निर्माते जेसू मोमीन यांच्या हत्येने होते. या प्रकरणात बहार चक्रवर्ती नावाच्या महिलेवर संशयाची सुई जाते आणि तीच गुन्हेगार असल्याचे भासवले जाते.
 
 
या सिरीजमध्ये राजीव खंडेलवाल Rajeev Khandelwal ‘अमर विश्वास’ या हुशार, तीक्ष्ण बुद्धीच्या आणि संवेदनशील वकिलाची भूमिका साकारत आहे. अमर विश्वास बहार चक्रवर्तीच्या वतीने खटला लढवताना सत्य केवळ वरवर दिसते तितके सोपे नसते, हे अधोरेखित करतो. खटल्याच्या प्रक्रियेत तो एकामागून एक गुपिते उलगडत जातो आणि संपूर्ण कथेला थरारक वळण मिळते.ट्रेलर लाँचवेळी राजीव खंडेलवाल यांनी आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले की, “अमर विश्वास हा पारंपरिक कोर्टरूम हिरो नाही. तो अत्यंत मानवी, भावनिक आणि न्यायासाठी ठामपणे उभा राहणारा आहे. या भूमिकेत नैतिक संघर्ष मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक सत्याची एक किंमत असते आणि ती संपूर्ण मालिकेत जाणवते. ट्रेलरमध्ये या प्रवासाची फक्त झलक दाखवण्यात आली आहे.”
 
 
 
 
शशांक शाह दिग्दर्शित ‘अमर विश्वास’ या वेब सिरीजची निर्मिती अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी. निशांदर यांनी केली आहे. राजीव खंडेलवालसह आमिर अली, रवी बहल आणि बरखा बिश्त यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही सिरीज ११ फेब्रुवारीपासून Amazon MX Player वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दरम्यान, राजीव खंडेलवालच्या अभिनय प्रवासाकडे पाहिले असता, त्यांनी कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. २००२ मध्ये ‘क्या हडसा क्या हकीकत’ या दूरदर्शन मालिकेतून त्यांनी अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर ‘कहीं तो होगा’ या मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. २००८ मध्ये ‘आमिर’ या चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. पुढे ‘टेबल नंबर २१’, ‘विल यू मॅरी मी’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. अलीकडेच ‘परम सुंदरी’ चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसलेल्या राजीवची ‘अमर विश्वास’ ही वेब सिरीज पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.