एसटी चालकास मारहाण करणे पडले महागात

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
८ जणांना तीन महिन्याचा कारावास
वरूड न्यायालयाचा निकाल
 
वरूड, 
ST driver एसटी चालकास मारहाण करून बसची तोडफोड करणार्‍या ८ आरोपींना वरूड सत्र न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सविस्तर असे की, नागपूर आगारातील बस अमरावतीवरून वरूडकडे येत असताना उमरखेड बसथांब्याजवळ बसच्या समोर एक दुचाकी जात होती. तेव्हा वरूडकडून समोरून तवेरा वाहन भरधाव येत होते. बसचालक दुचाकीला ओव्हरटेक करत असताना तवेरा चालक हा बसला कट मारून निघून गेला; मात्र, त्याने खडका फाट्याजवळून वाहन परत आणून बसच्या समोर लावून बस अडवली.
 
 
st za
 
ST driver त्यावेळी तवेरातून ८ आरोपी खाली उतरले व आमच्या गाडीला कट का मारला, असा उलट आरोप करून चालकाला मारहाण केली. इतकेच नव्हे, तर बसचीही तोडफोड केली. या प्रकरणी बसचालक अझरुद्दीन निजामुद्दीन शेख रा. वर्धमान नगर, नागपूर यांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबर २०१६ रोजी बेनोडा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. गुन्ह्यातील आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला गेला तेव्हा वाहन शिरखेड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये नाकाबंदी दरम्यान ग्राम लेहगाव येथे ताब्यात घेण्यात आले व बेनोडा पोलिस स्टेशनला आणण्यात आले. यावेळी वरूड तालुक्यातील विशाल नारायण कुरवाडे रा. परसोडा, मंगेश सुभाष ढोमणे रा लिंगा, सिद्धार्थ राजेश वाहने, प्रवीण जनार्दन नासरे, सचिन कचरूजी शेंडे, नरेश उकंडराव सोमकुवर, प्रवीण बाबाराव शेंडे, सुनील सुभाष ढोमणे, सुदर्शन विठोबा ठाकरे रा. लिंगा या ९ ही आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्य पोलिस निरीक्षक शांतीकुमार पाटील व त्यांच्या पथकाने करून दोषारोपपत्र वरूड न्यायालयात सादर केले. या गुन्ह्यामध्ये जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक सरकारी वकिल मंगेश भागवत व आरोपींचे वकिल आशिष वानखडे यांनी बाजू मांडली. बेनोड्याचे ठाणेदार विवेक देशमुख व वरूड सेशन कोर्टातील पैरवी अंमलदार विवेक हेडाऊ यांनी सर्व साक्षदारांना हजर केले. न्यायमूर्ती ए. ए. पंचभाई यांच्या न्यायालयाने गुन्ह्यातील ८ साक्षीदार तपासले. सर्व आरोपीना बुधवार ४ फेब्रुवारी रोजी तीन महिने साधा करावास व दोनशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, कलम ३४१ अंतर्गत १५ दिवस साधा करावास, कलम १४३ अंतर्गत १५ दिवस साधा करावास, सहकलम १४९ अंतर्गत १५ दिवस साधा करावास अशी शिक्षा सुनावली आहे.