10 वर्षांचा मुलगा बलात्कार करतो..दररोज 80 बलात्काराच्या घटना

    दिनांक :05-Feb-2026
Total Views |
राजस्थान
Taapsee Pannu, अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी ‘अस्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर परखड मत मांडत समाज आणि व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांकडे समाज हळूहळू सामान्य बातमी म्हणून पाहू लागला आहे, ही बाब अत्यंत धोकादायक असल्याची भावना तिने व्यक्त केली.
 

Taapsee Pannu, Assi movie, Taapsee Pannu statement on rape cases, 
‘अस्सी’च्या प्रमोशनसाठी जयपूरमध्ये पोहोचलेल्या तापसीने चित्रपटाच्या विषयावर बोलताना देशातील भयावह वास्तवावर भाष्य केले. “देशात दररोज जवळपास 80 बलात्काराच्या घटना नोंदवल्या जात आहेत. मी दिल्लीची आहे आणि दररोज अशा बातम्या वाचते. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे लोक आता बलात्काराकडे चोरीसारख्या गुन्ह्याप्रमाणे पाहू लागले आहेत. ही संवेदनाहीनता सहनशक्तीपलीकडे आहे. मला हे पाहून खूप राग येतो,” अशा शब्दांत तिने संताप व्यक्त केला.अल्पवयीन मुलांशी संबंधित गुन्ह्यांबाबत बोलताना तापसी अधिकच भावूक झाली. काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत तिने सांगितले की, या प्रकरणात आरोपी 10 ते 13 वयोगटातील मुले होती. “हे आणखी धक्कादायक आहे. जर 10 वर्षांचा मुलगा गुन्हेगार ठरत असेल, तर आपण कुठेतरी चुकतोय. मुलांची दिशाभूल होत असेल, तर त्याची जबाबदारी समाज म्हणून आपलीच आहे,” असे ती म्हणाली.
 
 
 
‘अस्सी’ या चित्रपटाचा Taapsee Pannu,  उल्लेख करत तापसीने सांगितले की, हा चित्रपट प्रेक्षकांना केवळ कथा दाखवत नाही, तर त्यांना न्यायाधीशाच्या भूमिकेत बसवतो. “हा चित्रपट पाहताना तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावे लागतील. तुम्ही काय न्याय देणार, तुमचा दृष्टिकोन काय आहे, हे महत्त्वाचं ठरणार आहे. अशा घटना का घडतात, याचा विचार करायला हा चित्रपट भाग पाडतो,” असे तिने स्पष्ट केले.मुलांच्या संगोपनाबाबत बोलताना तापसी म्हणाली की, बदलाची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे. “आपल्या मुलांना योग्य मूल्यं, योग्य शिकवण देणं अत्यंत गरजेचं आहे. समाजात कसं वागायचं, दुसऱ्याचा सन्मान कसा ठेवायचा, हे लहानपणापासूनच रुजवायला हवं. कुठेतरी आपण यात कमी पडतोय आणि त्याचे गंभीर परिणाम समोर येत आहेत,” असे तिचे मत होते.‘मुल्क’, ‘थप्पड’ आणि ‘आर्टिकल 15’सारख्या सामाजिक आशयाच्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ‘अस्सी’चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात समाज, व्यवस्था आणि आपल्या सामूहिक जबाबदाऱ्यांवर तीव्र प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तापसी पन्नूसह कानी कुसृती, रेवती, कुमुद मिश्रा, झीशान अयूब, नसीरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक आणि सीमा पाहवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘अस्सी’ हा चित्रपट येत्या 20 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून, तो प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे तर अंतर्मुख होण्याची संधी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.