भाजपाचे श्रीचंद तेजवानी महापौर
युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर
अमरावती,
Amravati : Srichand Tejwani Mayor अमरावती महानगरपालिकेत भाजपा, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ही महायुती सत्तेत आली आहे. भाजपाचे श्रीचंद तेजवानी महापौर तर युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे उपमहापौर म्हणून विजयी झाले आहे. दोघांनाही प्रत्येकी ५५ मते मिळाली. महायुतीचे संख्याबळ ५४ होते. त्यांना एमआयएमच्या १ सदस्यांने मतदान केल्याने महायुतीची मत संख्या ५५ झाली.
Amravati : Srichand Tejwani Mayor महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी दुपारी १ वाजतापासून महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशिष येरेकर तर सहाय्यक अधिकारी म्हणून आयुक्त सौम्या शर्मा होत्या. निर्धारीत वेळपर्यंत महापौर व उपमहापौरपदासाठी नामांकन दाखल करणार्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर झाला. सर्वप्रथम महापौरपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात भाजपाच्या श्रीचंद तेजवानी यांना ५५, त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते यांना १६ तर बसपाचे ईस्माईल लालुवाले यांना ३ मते मिळाली. लगेच उपमहापौरपदासाठी मतदान झाले. त्यात युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांना ५५, त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या लुबना तनवीर यांना १६ तर बसपाचे सचिन वैद्य यांना ३ मते मिळाली.
एमआयएम व उबाठात फूट
८७ सदस्य संख्य असलेल्या महापालिकेत भाजपाचे २५, युवा स्वाभिमानचे १५, काँग्रेस १५, एमआयएम १२, राष्ट्रवादी काँग्रेस ११, शिवसेना ३, बसपा ३, उबाठा २, वंचित १ असे पक्षीय संख्याबळ आहे. प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी एमआयएमचे ११, उबाठाचा व वंचितचा प्रत्येकी १ सदस्य असे १३ सदस्य तटस्थ राहीले. उबाठाच्या अन्य १ सदस्याने काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान केले. एमआयएमच्या मीरा कांबळे यांनी महायुतीच्या उमेदवाराला मत दिले. त्यांनी पक्षआदेश झुगारून मतदान केल्याचे गटनेता हाजी इरफान यांनी सांगितले. मीरा कांबळे यांनी आपल्याला पक्ष आदेश मिळाच नसल्याने विकासाच्या बाजुने मतदान केल्याचे स्पष्ट केले. एमआयएमने त्यांच्यावर कारवाईचा निर्णय घेतला आहे.