अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर आता अभिजीत सावंतचा धक्कादायक खुलासा

    दिनांक :06-Feb-2026
Total Views |
मुंबई,
Abhijeet Sawant पार्श्वगायक अरिजीत सिंग यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चित्रपटसृष्टीत गायकांच्या मानधनाचा आणि हक्कांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर देशातील पहिले ‘इंडियन आयडल’ विजेते अभिजीत सावंत यांनी दिलेल्या मुलाखतीत इंडस्ट्रीतील वास्तव उघड करत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. गायकांवर अनेकदा मोफत गाण्यासाठी दबाव आणला जातो, तसेच अनेक गायकांना उदरनिर्वाहासाठीही पुरेसे पैसे मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
 

Abhijeet Sawant  
इंडियन आयडल सीझन १ चे विजेते अभिजीत सावंत यांनी पेंटराइज स्टुडिओशी संवाद साधताना गायकांच्या मानधनावर स्पष्ट भूमिका मांडली. चित्रपटांमध्ये गाण्यासाठी मिळणाऱ्या पैशांबाबत विचारले असता ते म्हणाले की, इंडस्ट्रीला गायक हे चित्रपटांपेक्षा मोठे नाव बनावे असे वाटत नाही. त्यामुळे त्यांना ठरावीक, मर्यादित मानधन दिले जाते. विशेष म्हणजे, आजही अनेक संगीतकारांना चित्रपटांमधील त्यांच्या संगीतासाठी योग्य रॉयल्टी मिळत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
 
आपल्या अनुभवांविषयी Abhijeet Sawant  बोलताना अभिजीत सावंत यांनी सांगितले की, ‘लफझों में कह ना सकून’ या गाण्यावर काम करणारे बिड्डू यांच्यासारख्या काही कलाकारांनी पाश्चिमात्य देशांमध्ये गाणी गायली असून, त्या गाण्यांमधून मिळणारी रॉयल्टी त्यांना आयुष्यभरासाठी पुरेशी ठरते. मात्र भारतात गायकांना अनेकदा इतकीही कमाई होत नाही की त्यातून त्यांचा उदरनिर्वाह सुरळीत चालू शकेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.चित्रपटांपेक्षा स्टेज शोमधून गायकांना जास्त कमाई होते, असे मतही अभिजीत सावंत यांनी मांडले. यामागे इंडस्ट्रीचीच एक व्यवस्था असल्याचे ते म्हणाले. अनेक गायक संधींसाठी स्वतःहून तडजोड करतात, कारण एखादे गाणे मोठ्या स्टारच्या ओठांवर मॅच झाले, तर ते गाणे आयुष्यभर वाजत राहते, अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे कधी कधी गायक स्वतःहून मानधन न घेण्यासही तयार होतात, केवळ एखाद्या विशिष्ट निर्मात्यासोबत किंवा प्रोजेक्टमध्ये काम करण्याच्या इच्छेपोटी. “जर आम्ही ते गाणे नाकारले, तर दुसरे कोणीतरी ते करेल, म्हणून जे मिळेल ते स्वीकारावे लागते,” असे स्पष्ट शब्दांत अभिजीत सावंत यांनी सांगितले.दरम्यान, गायकांच्या मानधनावरील या चर्चेला वेग आला तो २७ जानेवारी रोजी, जेव्हा लोकप्रिय गायक अरिजीत सिंग यांनी सोशल मीडियावर पार्श्वगायनातून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी चाहत्यांचे आभार मानत, आता कोणतीही नवीन पार्श्वगायनाची जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले. अरिजीतच्या या निर्णयाने संगीतसृष्टीत खळबळ उडाली असून, गायकांच्या हक्कांबाबत आणि आर्थिक सुरक्षिततेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.अभिजीत सावंत यांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे बॉलिवूडमधील गायकांच्या परिस्थितीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, मानधन, रॉयल्टी आणि सन्मान याबाबत बदल घडवण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे.